कोल्हापूर तापले; उन्हाच्या झळांनी घामाघूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:46 IST2019-04-12T00:46:17+5:302019-04-12T00:46:23+5:30
कोल्हापूर : अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने ...

कोल्हापूर तापले; उन्हाच्या झळांनी घामाघूम
कोल्हापूर : अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने कोल्हापूरची हवा तापली आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकू लागल्याने प्रचारक आणि नागरिकही घामाघूम झाले आहेत.
कोल्हापुरात आजवर सर्वोच्च ४१ अंश सेल्सिअस तापमान गेल्यावर्षी मे महिन्यात नोंदवले गेले होते; पण आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. गुरुवारी सकाळी ३९ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी एकच्या सुमारास ४१ वर पोहोचले. चारनंतर पुन्हा ३९ वर आले. दुपारी १२ ते ३ या वेळेत तर उन्हात एक मिनिटही उभे राहू शकत नाही, इतकी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. अशा स्थितीतही प्रचाराचा धडाका सुरूच आहे. २३ ला होणाºया मतदानासाठी २१ रोजीच जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे; त्यामुळे अवघे १० दिवसच प्रचारासाठी राहिले आहेत. उन्हातान्हाची पर्वा न करताच उमेदवार, कार्यकर्ते सकाळी आठ वाजल्यापासून प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. सकाळी ११ पर्यंत पदयात्रा पूर्ण करून, त्यानंतर कोपरा सभा घेण्याचे आणि रात्रीच्या वेळेस जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.