कोल्हापूर : स्पेशालिस्ट ओपीडीचा प्रारंभ लांबणीवर, ‘ईएसआयसी’ला सांकेतिक क्रमांकाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:18 IST2018-04-30T16:18:23+5:302018-04-30T16:18:23+5:30
सांकेतिक क्रमांक (कोड नंबर) मिळाला नसल्याने राज्य कर्मचारी बिमा निगमच्या (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कोल्हापुरातील स्पेशालिस्ट ओपीडीचा (विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग) कामगार दिनी होणारा प्रारंभ आता लांबणीवर पडला आहे. ही तांत्रिक स्वरुपातील अडचण दूर झाल्यानंतर संबंधित ओपीडी मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : स्पेशालिस्ट ओपीडीचा प्रारंभ लांबणीवर, ‘ईएसआयसी’ला सांकेतिक क्रमांकाची प्रतिक्षा
कोल्हापूर : सांकेतिक क्रमांक (कोड नंबर) मिळाला नसल्याने राज्य कर्मचारी बिमा निगमच्या (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कोल्हापुरातील स्पेशालिस्ट ओपीडीचा (विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग) कामगार दिनी होणारा प्रारंभ आता लांबणीवर पडला आहे. ही तांत्रिक स्वरुपातील अडचण दूर झाल्यानंतर संबंधित ओपीडी मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.
ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृहामागील परिसरात ‘ईएसआयसी’ने पहिल्या टप्प्यात स्पेशालिस्ट ओपीडी सुरू करण्याचा निर्णय झाला. कामगार दिनी या ओपीडीचा प्रारंभ करण्याच्यादृष्टीने ईएसआयसीकडून गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू झाली.
याअंतर्गत रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्ते, ओपीडीच्या इमारतीचे रंगकाम, साफसफाई आणि वीजेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, ओपीडीसाठी आवश्यक असणारे फर्निचर आणि औषधांच्या उपलब्धतेसाठी सांकेतिक क्रमांक असणे आवश्यक आहे.
हा क्रमांक ईएसआयसीच्या नवी दिल्लीतील कार्यालयाकडून मिळालेला नाही. तो मिळविण्यासाठी कोल्हापुरातील ईएसआयसीकडून पाठपुरावा सुरू आहे. त्यासह पायाभूत सुविधांबाबतची काही कामे अद्याप सुरू आहेत.
हा क्रमांक मिळविण्यासह उर्वरीत कामांच्या पूर्णत्वास साधारणत: दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओपीडीच्या प्रारंभाचा कामगार दिनाचा मुर्हूत लांबणीवर पडला आहे.
या स्पेशालिस्ट ओपीडीसाठी सांकेतिक क्रमांक मिळाला नसल्याने औषधे, काही आवश्यक फर्निचर उपलब्ध झालेले नाही. औषधे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध नसताना ओपीडीचे उदघाटन करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ओपीडीचे उदघाटन पुढे ढकलले आहे. याबाबत खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस ओपीडीचा प्रारंभ केला जाईल.
- धनंजय महाडिक,
खासदार
कोल्हापुरातील या ओपीडीच्या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यासह दहा स्पेशालिस्ट डॉक्टरांसह सात निवासी डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी मुलाखतीची प्रक्रिया पार पडली आहे. ओपीडीच्या व्यवस्थापकीय कामासाठी सांकेतिक क्रमांक असणे आवश्यक आहे. हा क्रमांक मिळविण्याबाबत मुख्य कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हा क्रमांक मिळेल.
-डॉ. दुष्यंत खेडीकर,
आरोग्य पर्यवेक्षक, ईएसआयसी कोल्हापूर.