कोल्हापूर : महामॅरेथॉन नोंदणीस तुडुंब प्रतिसाद.... नावनोंदणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:43 IST2018-12-31T13:38:06+5:302018-12-31T13:43:23+5:30
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकमत समूहाच्या कोल्हापूर महामॅरेथॉनच्या नोंदणीला राज्यातील धावपटू, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, अधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व सभासद आणि समस्त कोल्हापूरकरांनी तुडुंब प्रतिसाद दिल्याने रविवारपासून नावनोंदणी बंद करण्यात आली.

कोल्हापूर : महामॅरेथॉन नोंदणीस तुडुंब प्रतिसाद.... नावनोंदणी बंद
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकमत समूहाच्या कोल्हापूर महामॅरेथॉनच्या नोंदणीला राज्यातील धावपटू, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, अधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व सभासद आणि समस्त कोल्हापूरकरांनी तुडुंब प्रतिसाद दिल्याने रविवारपासून नावनोंदणी बंद करण्यात आली.
आता स्पर्धकांना प्रत्यक्ष धावण्याची आस लागून राहिली आहे. स्पर्धकही सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या महामॅरेथॉनची जय्यत तयारी करीत आहेत.
‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’मध्ये स्पर्धकांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या पर्वाच्या यशस्वी संयोजनानंतर कोल्हापुरातील यंदाचे दुसरे महामॅरेथॉनचे पर्व सहा जानेवारीला होत आहे. ‘मी धावतो... माझ्यासाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व उच्च तंत्रज्ञानयुक्त अशा या स्पर्धेत सर्वच स्तरांतील नागरिकांनी तुडुंब प्रतिसाद दिला आहे.
यात शालेय विद्यार्थी ते कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी, जवान, लष्करातील जवान, सर्व खेळाडू, प्राध्यापक, शिक्षक, उच्च सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांचा समावेश आहे.
अवघ शहर मॅरेथॉनमय
अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्तरांतील धावपटूंनी गेल्या महिन्याभरापासून धावण्याचा व स्पर्धेत अग्रक्रम पटकाविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अनेक धावपटू पहाटे साडेचार वाजल्यापासून शहरातील विविध मैदानांत सराव करताना दिसत आहेत.
विशेषत: शिवाजी विद्यापीठ, रंकाळा तलाव, पोलीस परेड मैदान, पीडब्ल्यूडी उद्यान, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग, शिवाजी स्टेडियम, गांधी मैदान, आदी ठिकाणी धावण्याचा सराव करणारी अनेक मंडळी दिसत आहेत. प्रत्येकाच्या तोंडी ‘महामॅरेथॉनमध्ये पळायचं हाय’ एवढेच शब्द आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरात पहाटेपासून महामॅरेथॉन स्पर्धेची तयारी करणारे जथ्थेच्या जथ्थे दिसत आहेत.
शहराचा नकाशा असणारे मिळणार ‘मेडल’
या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.
‘महामॅरेथॉन’मुळे धावण्याच्या व्यायामास बळ
‘लोकमत’ समूहाने हा उपक्रम राज्यातील पाच शहरांत सुरू केला आहे. त्यात कोल्हापूरच्या कला, क्रीडानगरीतही हा उपक्रम राबवून कोल्हापुरातही मॅरेथॉन तथा धावणे खेळास चालना दिली आहे. शिस्तबद्ध नियोजनामुळे ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या रूपाने मॅरेथॉनपटू व आयर्नमन होण्यास हातभार लागत आहे. गतवर्षीच्या यशस्वी नियोजनाबद्दल धन्यवाद व ६ जानेवारीला होणाऱ्या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वास हार्दिक शुभेच्छा!
- अमल महाडिक, आमदार
धावण्याचा व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. धावण्याने आपले शरीर सुडौल होण्यास त्यामुळे मदत होतेच, पण त्यासोबतच आपली आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील सुधारते. धावण्यासारखा सोपा व्यायाम नाही. त्यासाठी ना विशेष प्रशिक्षण लागते, ना महागड्या वस्तू. त्यामुळे दररोज धावण्याचा व्यायाम केलात तरी आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो.
धावण्याच्या व्यायामामुळे आपली बौद्धिक क्षमता, आत्मविश्वास वाढतो. दिवसभर फ्रेश राहता येते, तणावमुक्तीसह अनेक फायदे या व्यायामामुळे होतात. माझ्या दैनंदिन कामातून वेळ काढून दिवसातून किमान अर्धा तास तरी धावण्याचा व्यायाम करतो. ‘लोकमत महामॅरेथॉन’ ही एक धावणाºयांसाठी व्यायामाची पर्वणीच ठरणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये मी धावणार आहेच, माझ्या साथीदारांनीही धावण्यासाठी सज्ज राहावे.
- राजेश क्षीरसागर, आमदार
‘लोकमत’चा उपक्रम प्रेरणादायी
‘लोकमत’ समूहाने आजच्या पिढीची गरज ओळखून आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. याबद्दलची जाणीव करून देऊन बिनपैशांचा व्यायाम म्हणून ओळखला जाणारा धावणे अर्थात मॅरेथॉनची ही चळवळ उभी केली आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूरकरांमध्ये सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. विशेष करून धावपळीच्या युगात शरीराकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही. ही बाब ध्यानी घेऊन ‘लोकमत’ने हा उपक्रम राबवीत देशाला उद्याची पिढी आरोग्यदायी व सुदृढ देण्याचा निश्चिय केला आहे. या उपक्रमात मी सहभागी होत आहे. जे सहभागी होणार नाहीत, त्यांनी त्यात सहभागी असणाऱ्यांना चीअर अप करण्यासाठी महामॅरेथॉनच्या मार्गावर उभे राहून स्पर्धकांना प्रोत्साहित करावे.
- मालोजीराजे, माजी आमदार,
उपाध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन
‘लोकमत’ समूहाने महामॅरेथॉनच्या रूपाने, धकाधकीच्या जीवनात आरोग्यदायी जीवन कसे जगावे, याकरिता जनजागृती नव्हे तर मॅरेथॉन नावाची एक चळवळच उभी केली आहे. ‘लोकमत’च्या सर्वच उपक्रमांना ‘क्रिडाई’चा कायम पाठिंबा असतो. सहा जानेवारीला होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेसाठी माझ्या व ‘क्रिडाई’तर्फे शुभेच्छा...
- महेश यादव, अध्यक्ष, क्रिडाई