भाकपाचे २१ पासून कोल्हापूरात राज्य अधिवेशन

By Admin | Updated: February 13, 2015 23:48 IST2015-02-13T23:48:06+5:302015-02-13T23:48:17+5:30

नामदेव गावडे : सुधाकर रेड्डी, भालचंद्र कानगो यांचे होणार मार्गदर्शन

Kolhapur state session from CPI till 21st | भाकपाचे २१ पासून कोल्हापूरात राज्य अधिवेशन

भाकपाचे २१ पासून कोल्हापूरात राज्य अधिवेशन

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २२ वे राज्य अधिवेशन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होत आहे, अशी माहिती पक्षाचे नेते नामदेव गावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
गावडे म्हणाले, २१ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता टाऊन हॉल उद्यान येथून मिरवणूक निघणार असून ती महापालिका, व्हिनस कॉर्नरमार्गे येऊन दसरा चौक येथे विसर्जित होणार आहे. अधिवेशनाच्या खुल्या सत्राचे उद्घाटन दुपारी ३ वाजता जाहीर सभेने होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी व माजी खासदार सुधाकर रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून न्यूएजचे संपादक व पक्षाचे सचिव मंडळ सदस्य शमिम फैजी, राज्य सेक्रेटरी भालचंद्र कानगो उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे भूषविणार आहेत.या अधिवेशनात विविध जिल्ह्णातून निवडून आलेले सुमारे चारशे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. ते आपली मते मांडतील. तसेच काही महत्वाच्या प्रश्नांवर विविध जिल्ह्णात सहकार, कोरडवाहू शेतीमधील समस्या, पतधोरण व शासन, केळकर समिती अहवाल अशा महत्वाच्या विषयावर विचारवंत, राजकीय कार्यकर्ते यांची मते समजून घेण्यासाठी परिसंवादही आयोजित केले आहेत. राष्ट्रीय कौन्सिलतर्फे सध्याचे राजकीय परिस्थितीबाबतचे विश्लेषण नेटवर उपलब्ध असून त्याबाबतची जाहीर चर्चा व मते आग्रहपूर्वक विचारात घेऊन भाकप राजकीय अहवाल जनतेचा बनविण्याचा प्रयत्न करत आहे.
देशात सत्ता बदलली असून भाजपाने दोन्ही निवडणूकीत यश मिळविले आहे. परंतु निवडणुकीत दिलेली आश्वासने फोल ठरली होती. जनतेमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दिल्ली मधल्या निवडणुकीने भाजपाचा फोलपणा जनतेच्या लक्षात आला आहे. खासगीकरण, जागतिकीकरण, याला कॉँग्रेस किंवा धर्मांध भाजपा पर्याय असू शकत नाही. त्या पुढील काळात कोणत्या मार्गाने वाटचाल करावी, याबाबत या देशातील परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय करावा लागणार आहे. यावेळी कामगार, विद्यार्थी, युवक, शेतकरी, शेतमजूर, मोलकरीण, बॅँक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, बांधकाम मजूर, अंगणवाडी कर्मचारी आदींनी उपस्थित रहावे.
यावेळी दिलीप पवार, एस. बी. पाटील, रघुनाथ कांबळे, शिवाजी माळी, अनिल चव्हाण, सुभाष वाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur state session from CPI till 21st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.