भव्य वाहन रॅलीद्वारे कोल्हापूरकरांचा सरकारला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:38+5:302021-01-08T05:22:38+5:30
कोल्हापूर: वीजबिल भरणार नाही म्हणजे नाहीच, भले आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही माफी घेणारच, रस्त्यावर उतरणारच, असा दृढनिश्चय ...

भव्य वाहन रॅलीद्वारे कोल्हापूरकरांचा सरकारला इशारा
कोल्हापूर: वीजबिल भरणार नाही म्हणजे नाहीच, भले आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही माफी घेणारच, रस्त्यावर उतरणारच, असा दृढनिश्चय करत गुरुवारी कोल्हापूरकरांनी भव्य वाहन रॅलीद्वारे सरकारला वीजबील माफीचा निर्णय घ्या, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा दिला. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना हे निवेदन देण्यात आले. मोटरसायकल, रिक्षा, ट्रक, ट्रॅव्हल बस आदीसह निघालेल्या या मोर्चाने सकाळी १० ते दुपारी दीडपर्यंत अवघे शहर जाम केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वीजबिल भरणार नाही, कृती समितीने गुरुवारी लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबील माफीसाठी वाहन रॅलीचे आयोजन केले होते. वीजबिल भरणार नाही, असे फलक वाहनांना लावून गांधी मैदानातून दहा वाजता रॅलीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर, दसरा चौक, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, बागल चौक, शाहू मिल चौक, सायबर, शाहू नाका, मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशन रोड या प्रमुख मार्गांवरुन मार्गक्रमण करत ही रॅली दुपारी पावणे एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. वाहने पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांना निवेदन देऊन जनतेच्या भावना सरकारला कळवा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलने होतील, असा इशारा दिला. दरम्यान, यावेळी पूर्वपरवानगी घेऊन मोर्चा काढला असताना आणि पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गानेच शांततेत माेर्चा काढला असतानाही प्रशासनाने मोर्चाला आडकाठी का आणली, यावरुन शिष्टमंडळाने जाब विचारत प्रशासनाचा निषेध नाेंदवला.
स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी हे बिनखांबी येथून रॅलीत सहभागी झाले व पापाची तिकटीनंतर निघूनही गेले. प्रताप होगाडे हेदेखील बैठकीकरिता दिल्लीला गेल्याने ते येऊ शकले नाहीत. प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भूयेकर, कृती समिती निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, जालंदर पाटील, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, सुभाष जाधव यांनी केले. त्यांच्यासोबत मारुती पाटील, विजय करजगार, सुजीत चव्हाण, सुरेश जरग, प्रकाश केसरकर, भाऊ घोगरे, सुनील कदम, सत्यजित कदम, राहुल चिकोडे हे सहभागी झाले होते.
चौकट ०१
रॅलीची भव्यता
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेली ही रॅली शहरवासियांच्या कुतूहलाचा विषय ठरली. लॉरी ऑपरेटर, धान्य, वाळू वाहतूक, रिक्षा, ट्रॅव्हल बसेस असोसिएशनने यात सहभाग घेतल्याने रॅलीची भव्यता वाढली. रॅलीची सुरुवात आणि शेवट यात जवळपास पाच किलोमीटरचे अंतर होते, एवढी लांब वाहनांची रांग लागली होती.
चौकट ०२
पोलिसांचे काटेकोर नियोजन
जुना राजवाडा पोलीस ठाण्याने आंदोलकांबराेबरच मंगळवारीच बैठक घेऊन रॅलीचा मार्ग निश्चित केल्याने त्यानुसार वाहतुकीचे नियोजन केले होते. चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त आधीच तैनात होता. रॅलीचा मार्ग आधीच मोकळा करुन ठेवल्याने रॅली १० वाजता सुरु होऊनदेखील एक वाजण्याच्या आतच गांधी मैदान ते शाहू नाका ते मध्यवर्ती बसस्थानक असा प्रवास करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर संपली. पर्यायी व एकेरी मार्गाने वाहतूक वळविल्याने वाहतूकीची मोठी कोंडी टाळता आली.
चौकट ०३
कोल्हापूर हिसका दाखवू
वीजबिलाची माफी देऊन दिवाळी गोड करणार होता, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत निवास साळोखे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हाला जबाबदार धरु नका, मग किती नोटीस काढायच्या त्या काढा, जनआंदोलन उभे राहणारच आणि कोल्हापुरी हिसका दाखवणारच, असा इशारा साळोखे यांनी दिला.
(फोटो स्वतंत्र पाठवत आहे)