पॅचवर्कचा खेळ, राजकारणी, कंत्राटदारांचा बसलाय मेळ; खड्ड्यांमुळे कोल्हापूरकरांमध्ये संताप

By पोपट केशव पवार | Updated: September 20, 2025 16:42 IST2025-09-20T16:42:12+5:302025-09-20T16:42:28+5:30

मुलं घरी येईपर्यंत जिवात जीव नसतो

Kolhapur residents are angry over the patchwork and potholes on the road | पॅचवर्कचा खेळ, राजकारणी, कंत्राटदारांचा बसलाय मेळ; खड्ड्यांमुळे कोल्हापूरकरांमध्ये संताप

पॅचवर्कचा खेळ, राजकारणी, कंत्राटदारांचा बसलाय मेळ; खड्ड्यांमुळे कोल्हापूरकरांमध्ये संताप

पोपट पवार

कोल्हापूर : अनेकजण खड्ड्यात पडून जखमी झाले, कायमचे घरी बसले, मणक्याचे आजार झाले. लोकांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावर आंदोलन केले की महापालिका तेवढ्यापुरते पावडर-लाली लावून पॅचवर्कचा दिखावा करते. अहो, आम्हाला जसं कळतंय तसं कोल्हापुरात खड्डे पाहतोय. ठेकेदारांनी रस्ते चांगले केले तर त्यांना पुन्हा काम उरेल का? त्यामुळे पावडर-लालीचा हा खेळ त्यांच्याही आवडीचा झाला आहे. पापं त्यांनी करायची अन् भाेगतोय आम्ही या शब्दांत कोल्हापूर शहरातील नागरिकांनी खड्ड्याचे भीषण वास्तव मांडले. 

एका आठवड्यात खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा, असे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रस्त्यांचा आढावा घेतला असता भयाण वास्तव समोर आले. शहरातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्ड्यांची माळ दिसत नाही. अगदी ज्या रस्त्यावर मागील महिनाभरात डांबर-सिमेंट पडले आहे अशा रस्त्यांवरही खड्डे पडल्याने दर्जाहीन कामाचा मुद्दाही समोर आला आहे. खड्डे पाहून महापालिका कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखवणार असेल तर शहरातील झाडून सगळ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल होतील अशी परिस्थिती आहे.

कुठे आहेत सर्वाधिक खड्डे

शहरातील कोंडाओळ, व्हीनस कॉर्नर, उद्यमनगर, मंगळवारपेठ, राजारामपुरी, बसंत बहार टॉकीज परिसर, शनिवारपेठ, प्रतिभागनर, गोखले कॉलेज रस्ता या परिसरात खड्डेच खड्डे आहेत.

मुलं घरी येईपर्यंत जिवात जीव नसतो

रस्त्यांवरील खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असल्याने शाळा, कॉलेजला दुचाकी किंवा सायकलवर जाणाऱ्या मुलांनाही पालक जरा जपून जा, खड्डे खूप आहेत असा सल्ला देतात. मुलगा किंवा मुलगी घरी येईपर्यंत जिवात जीव नसतो असा अनुभव गोखले कॉलेज परिसरातील नागरिकांनी सांगितला.

आम्हाला जसे कळतंय तसे कोल्हापुरात खड्डे आहेत. खड्डा नाही असा एकही रस्ता नाही. पॅचवर्क करून महापालिका नेमकं कुणाचं समाधान करतेय हेच कळत नाही. - विजय जोंधळे, व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर

शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच रस्ते केले जात आहेत का, असा प्रश्न पडतो. - अवधूत पाटील, राजारामपुरी.

एकवेळ जगातील सगळे प्रश्न सुटतील. पण कोल्हापुरातील खड्ड्यांचा प्रश्न सुटणार नाही. खड्डे, कंत्राटदार आणि महापालिका अशी घट्ट विणच बांधली गेली आहे. - गौरव कांबळे, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

रस्ता केल्यानंतर दोषदायित्वासाठी ठरावीक कालावधीत असतो. त्याच्या आत रस्ता खराब झाला तर संबंधित ठेकेदाराकडून तो दुरुस्त करून घेतला जातो. त्याने जर तो केला नाही तर त्याला काळ्या यादीत टाकले जाते. शहरात अशा कारवाया केल्या आहेत. - रमेश मस्कर, शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका

Web Title: Kolhapur residents are angry over the patchwork and potholes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.