कोल्हापूर : तामिळनाडूमधील पोथाईमलाई पर्वताजवळून ट्रॅपडोअर कोळ्याच्या नविन प्रजातीचा शोध लावण्यात कोल्हापुरातील तीन संशोधकांसह पाचचणांना यश मिळाले आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, विवेक वाघे यांच्यासह कोल्हापुरातील संशोधक अक्षय खांडेकर, स्वप्निल पवार आणि सत्पाल गंगलमाले यांचा या संशोधनात सहभाग आहे. नव्याने शोध लागलेल्या प्रजातीचे नामकरण त्यांच्या भारतीय द्विपल्पामधील दक्षिणेकडील आढळक्षेत्रावरुन 'हेलिगमोमेरस ऑस्ट्रेलिस' असे केलेले आहे.ट्रॅपडोअर कोळी त्यांच्या बिळांना झाकण्यासाठी दरवाजे बनवण्यावरुन ओळखले जातात. हे दरवाजे बाहेरील बाजूने भोवतालाशी तंतोतंत मिसळून गेलेले असतात. दरवाज्याचा उपयोग ते स्वसंरक्षणासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी करतात. नव्याने शोध लागलेल्या प्रजातीमधील कोळ्यांची बीळे सपाट जमीनीवरती उभी खोदलेली आढळली.तमिळनाडू मधील तिरुनेलवेली जिल्ह्यातील पोथाईमलाई पर्वताच्या पायथ्याजवळ ही प्रजाती आढळली. जमीनीवरती वावरणारे छोटे किटक हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. नव्या प्रजातीच्या शोधामुळे भारतातील 'सव्हाना' प्रकारच्या गवताळ प्रदेशांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
कोल्हापूरच्या संशोधकांनी शोधली दक्षिण टोकावर कोळ्याची नवी प्रजात
By संदीप आडनाईक | Updated: May 26, 2025 19:29 IST