Kolhapur: विधानसभेसाठी राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला, नरके यांच्याही गाठीभेटी वाढल्या
By राजाराम लोंढे | Updated: July 9, 2024 17:01 IST2024-07-09T16:59:22+5:302024-07-09T17:01:46+5:30
राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी असला तरी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापू ...

Kolhapur: विधानसभेसाठी राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला, नरके यांच्याही गाठीभेटी वाढल्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी असला तरी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापू लागले आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी ‘करवीर’मधून शड्डू ठोकला असून, त्यांनी संपर्क दौऱ्यांचा अक्षरश: धडाका लावला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही हालचाली गतिमान केल्या असून, त्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ‘कुंभी’ साखर कारखान्याचे संचालक मंडळांनी गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ मध्ये चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली; मात्र २०१९च्या निवडणुकीत पी. एन. पाटील यांनी दोन्ही निवडणुकांचा हिशोब चुकता केला. त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघात राबता ठेवला होता. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्रदीप नरके हे मतदारसंघात सक्रिय झाले. त्यामुळे २०२४ला पाटील-नरके यांच्यामध्ये निकराची झुंज पाहावयास मिळणार, असे वाटत असताना पी. एन. पाटील यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात ‘करवीर’मधील काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांचे वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील पुढे आले आहेत. वडिलांच्या दु:खातून सावरून ते पुन्हा नेटाने कामाला लागले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. व्यक्तिगत भेट घेऊन लोकांमध्ये ते मिसळत आहेत. चंद्रदीप नरकेही त्याच ताकदीने सक्रिय झाले आहेत. ‘कुंभी’ कारखाना, कुंभी बँकेच्या संचालकांवर प्रत्येक गावाची जबाबदारी दिली आहे.
संपर्क, सामान्य माणसाशी असलेली नाळ या बळावर नरके यांनी दोन वेळा मैदान मारले. आताही तीच शिदोरी घेऊन ते मैदानात उतरले आहेत. राहुल पाटील हे नवखे असले तरी त्यांच्या सोबत दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या विषयाची सहानुभूती आहे. त्यांचा शांत स्वभाव आणि त्यांच्याकडील नम्रता पाहता आगामी निवडणुकीत पाटील-नरके यांच्यात निकराची झुंज होणार, हे निश्चित आहे.
साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. पाटील यांच्या पश्चात राहुल यांच्या निवडणुकीची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असून ‘साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी’ अशी टॅगलाईन सध्या सोशल मीडियातून घुमू लागली आहे.