कोल्हापूर : कोल्हापूरचा विशेष विद्यार्थी रचित नरसिंघानी स्पोर्ट्स असोसिएशन फॉर इंटिलिक्य्चुअल डिसॲबिलिटी ऑफ थायलंड आयोजित बँकाक येथे २० ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत जलतरण स्पर्धेच्या विटारस स्वीमिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.रचित स्वमग्न विद्यार्थी असून गोपालकृष्ण गोखले कॉलेजमध्ये सध्या द्वितीय वर्ष बीएस्सीमध्ये शिकत आहे. येथील छत्रपती शिवाजी जलतरण तलावात प्रशिक्षक प्रभाकर डांगे आणि महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी उच्च स्तरीय सराव करत आहे. रचितने २०१८ पासून जलतरण स्पर्धेत यश मिळवण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत त्याने स्पेशल ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये एक रौप्य, मालवण येथील नवव्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून ऑलिम्पिक इंडियासह राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. रचितने आपल्या दिव्यांग स्थितीवर मात करुन केवळ जलतरण क्रीडा प्रकारात स्वत:ची प्रगती केली नाही तर दहावीच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवून स्वत:ला सिध्द केले आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा त्याचा मानस आहे. आई योजना नरसिंगानी आणि गोखले कॉलेजच्या चेयरमन डॉ. मंजिरी मोरे यांचे त्याला प्रोत्साहन लाभत आहे.
कोल्हापूरचा विशेष विद्यार्थी रचित जलतरणात करणार भारताचे प्रतिनिधित्व, बँकाक येथे होणार स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:32 IST