कोल्हापूर : युरोप सहलीसाठी बुकिंग करून देण्याच्या निमित्ताने एका कुटुंबाला ४ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घालणारा प्रशांत पुरुषोत्तम जावडेकर (वय ३८, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याने दोन मार्च २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत फसवणूक केली. याबाबत शाल्मली सुनील जोशी (वय ५०, रा. निंबाळकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली होती. अटकेतील संशयिताने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाल्मली जोशी या अडीच वर्षांपूर्वी कुटुंबासह परदेश सहलीला जाण्याच्या तयारीत होत्या. त्याचवेळी जिनिअस वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी प्रा.लि. कंपनीचा एजंट असल्याचे सांगत प्रशांत जावडेकर याने मोबाइलवरून जोशी यांच्याशी संपर्क साधला. २ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ दरम्यान जोशी यांच्यासह त्यांचे पती आणि मुलगा अशा तिघांसाठी प्रत्येकी १ लाख ५५ हजार रुपयांचे पॅकेज देत असल्याचे त्याने सांगितले. बुकिंगसाठी ४ लाख ८५ हजार ५५७ रुपये त्याने स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी रक्कम पाठवली. पैसे घेऊन ठरलेल्या मुदतीत त्याने सहलीच्या प्रवासाची तिकिटे दिली नाहीत. याबाबत जिनिअस वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी कंपनीकडे तक्रार केली असता, त्यांनी जावडेकर हा त्यांच्याकडे एजंट नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.अडीच वर्षांनी अटकगुन्हा दाखल होताच शाहूपुरी पोलिसांचे पथक संशयिताच्या शोधासाठी कल्याणमधील पत्त्यावर गेले होते. मात्र, तो पसार झाला होता. त्यानंतर तपास रखडला होता. मात्र, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गेल्या तीन वर्षांतील प्रलंबित तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी कल्याणमध्ये जाऊन जावडेकर याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
युरोप सहलीच्या बुकिंगचे ४.८५ लाख हडपले; अडीच वर्षांनी ठाण्यातील ठकसेन प्रशांत जावडेकर याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:42 IST