दीड वर्षे प्रयत्न करीत होते; कोल्हापूरच्या बालवैज्ञानिकांना लंडनला जाण्यासाठी हवीय मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:54 IST2019-12-22T00:51:54+5:302019-12-22T00:54:19+5:30
नसिम सनदी । कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार ...

दीड वर्षे प्रयत्न करीत होते; कोल्हापूरच्या बालवैज्ञानिकांना लंडनला जाण्यासाठी हवीय मदत
नसिम सनदी ।
कोल्हापूर : कोल्हापुरातील बालवैज्ञानिकांनी संशोधित केलेला रोबोट आता थेट लंडनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरभारती शिक्षण संस्थेच्या वि. स. खांडेकर प्रशाला या सर्वसामान्यांच्या शाळेतील दहावीच्या वर्गातील चार विद्यार्थ्यांनी दीड वर्षाच्या अथक प्रयत्नांनी हे लखलखीत यश साकारले आहे. जूनमध्ये लंडनला जाण्याची संधी मिळणारी ही कोल्हापुरातील एकमेव शाळा ठरली आहे. अनिकेत लोहार, सौरभ जाधव, अथर्व मोहिते, सोहम फडके या सामान्य कुटुंबांतून आलेल्या मुलांनी हा रोबोट तयार केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा स्वयंचलित हाताळणाºया रोबोटिक तंत्रज्ञानाने अवघ्या जगावर गारूड केले आहे. मग त्यापासून शालेय विद्यार्थी तरी कसे लांब राहणार? जिज्ञासू, संशोधन वृत्ती अंगी असणा-या या मुलांना अटल टिकरिंग लॅबने संशोधनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि या संधीचे सोने करीत हे बालवैज्ञानिक आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापुरात शाहूपुरी व्यापारपेठेतील या शाळेतील विद्यार्थ्यांनीही यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत सहभाग घेतला.
रोबोटिकला प्रथम क्रमांक मिळून ते राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाले. १५ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या स्पर्धेत देशभरातील १८६ संघांतून यांच्या रोबोटिकला चौथा क्रमांक मिळून ते लंडनमध्ये जून २०२० मध्ये होणाºया स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भरत शास्त्री, प्रमोद कुलकर्णी, वंदना काशीद, नेहा कनेकर या शिक्षकांचे यामागील श्रम लाखमोलाचे आहेत.
सर्वसामान्य घरातील मुलांचे असामान्य काम
या चारही बालवैज्ञानिकांची घरची परिस्थिती बेताचीच; पण या पोरांचा आत्मविश्वास आणि स्वप्ने मात्र आकाशालाही आपल्या कवेत घेण्यासारखी आहेत. रोबोटिक इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सोहमचे वडील नोकरी करतात; तर आई गृहिणी आहे. कमीत कमी वेळेत रोबोट तयार करण्यावर येथून पुढे भर राहील असे तो सांगतो. दसरा चौकात राहणा-या अनिकेत लोहारचे वडील साधे फॅब्रिकेटर, तर आई नोकरी करते. पाचवीपासूनच तोडण्या-जोडण्याच्या छंदानेच संशोधनाकडे वळविल्याचे सांगून सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा तो व्यक्त करतो. राजारामपुरीतील सौरभ जाधवचे वडील आॅफिसबॉय, तर आई गृहिणी. अॅनिमेशन डिझायनर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. सम्राटनगरातील अथर्व मोहितेचे वडील बँकेत नोकरीस, तर आई गृहिणी. मित्रासमवेत गोडी लागली आणि यात लक्ष घातले. इलेक्ट्रिकलमध्ये करिअर करायचे आहे, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.
खर्चाची विवंचना
लंडनला जाण्याची संधी मिळत असल्याने या बालवैज्ञानिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे; पण स्पर्धेत चौथ्या स्थानी असल्याने खर्चाचा भार वैयक्तिकरीत्या उचलावा लागणार आहे. खांडेकर प्रशाला ही सर्वसामान्य वर्गातील मुलांची शाळा आहे. एकेका मुलाचा लाखाचा खर्च परवडणारा नसल्याने आता संस्थेने मदतीचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
वि. स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून रोबोट साकारला आहे.