संदीप आडनाईककोल्हापूर : जागतिक वारसास्थळांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर शुक्रवारी रात्री आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले, तसेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.यावेळी शहरातून लेझीम व पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसीफ मोकाशी, अधिकारी, कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
महत्त्व काय?
- स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले.
- शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हा मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे.
- माचीस्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माचीस्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.
हे होते पथकआयकोमॉसचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हेवांग ली यांच्यासह एएसआयचे अतिरिक्त महानिर्देशक (जागतिक वारसा) जानवीश शर्मा, राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, डॉ. शुभा मजुमदार
जाचक अटीची ग्रामस्थांना भीतीजागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश झाल्याने नाखुश आहेत. पन्हाळावासीयांनी याबाबत बऱ्याच बैठकीत विरोध दर्शविला होता. जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यास जाचक अटी लादल्या जातील, असे ग्रामस्थांना वाटते; म्हणून त्यांचा विरोध होता.
जागतिक वारसा यादीत पन्हाळ्याचा समावेश झाला, ही बातमी शहरवासीयांना समजली आणि गावात सन्नाटा पसरला. पुरातत्त्वपेक्षा जास्त जाचक अटींना गावकरी सामोरे जावे लागणार असे वाटते. - रमेश स्वामी, ग्रामस्थ, पन्हाळाआता तटबंदीपासून शंभर मीटरच्या आतील घरातील माणसांना आपले आयुष्यभर जपलेले क्षण विसरावे लागणार आहेत. यात येणारी घरे सोडावी लागणार हे निश्चित आहे.- रामानंद गोसावी, ग्रामस्थ, पन्हाळा
छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झाला, हे अभिमानास्पद आहे. याबद्दल प्रशासन व स्थानिक नागरिकांचे अभिनंदन. आता पन्हाळा व कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली आहे. पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आणि गडाचे वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करूया. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, लोकप्रतिनिधींनी मोलाचे सहकार्य व पाठपुरावा केला, तसेच पन्हाळा येथील स्थानिक नागरिकांनी पूर्ण योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले. -अमोल येडगे, जिल्हाधिकारी
जगभरात फक्त २३ ते २४ वास्तू हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा समावेश होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून आपला देदीप्यमान इतिहास जगभर जाणार आहे. आता शासनाने पन्हाळगडावरील नागरिकांचे गैरसमज दूर करावेत तसेच सर्व गडांवरील अतिक्रमण बेकायदेशीर बांधकामे वेगाने काढून टाकावीत. - इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक
महाराष्ट्राला लाभलेली गडकिल्ल्यांची धरोहर आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे, हा खूप मोठा सन्मान आहे. जगभरातील पर्यटक पन्हाळगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी येथे येणार आहेत. युनेस्कोची टीम वर्षातून एकदा या वारसा स्थळांना भेट देत असते, त्यामुळे वास्तूंच्या मूळ बांधणीत अजिबात बदल होता कामा नये, ते टिकवणे तसेच जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे व हे प्रत्येक कोल्हापूरवासीयांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. - अमरजा निंबाळकर, अध्यक्षा, कोल्हापूर हेरिटेज कमिटी