कोल्हापूर : पर्यावरणीय मूल्य मिळाले, तरच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल : रघुनाथ पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 13:59 IST2018-08-03T13:55:03+5:302018-08-03T13:59:35+5:30
शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले.

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठातील राज्यस्तरीय कार्यशाळेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून पी. डी. राऊत, बालेखान मुजावर, डी. आर. मोरे, देवानंद शिंदे उपस्थित होते.
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ‘कार्बन क्रेडिट्स आणि जल व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या भाषाभवन सभागृहामधील या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे प्रमुख उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले, शेतकरी हा खरा संशोधक आहे. शेतीच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या विविध वाणांचा प्रयोगांती शोध लावून पिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. शेतकरी पिकांच्या माध्यमातून शेतीला पाणी देतो, म्हणजेच तो पृथ्वीचे तापमान कमी करण्यास सहकार्य करीत असतो. देशातील विविध भागांमध्ये उपलब्ध परिस्थितीत शेतीच्या माध्यमातून देश जगविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करतो.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विविध उद्योगधंदे व इतर माध्यमांतून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक झाल्याने ते साठवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त पद्धतीने शेतीमध्ये हे करता येणे शक्य आहे. यामुळे वातावरणातील कार्बनचा भार कमी होणार आहे. शेतकरी कशाप्रकारे कार्बन साठवणूक करतो, त्याचे मूल्यमापन कसे करणार, यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
शेतीच्या बळावर देशाला मोठ्या प्रमाणावर कार्बन क्रेडिटस् मिळविणे शक्य आहे. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, बालेखान मुजावर, गिरीश राऊत, प्रणाली राऊत, ए. डी. जाधव यांच्यासह सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बीड, आदी विविध भागांतील शेतकरी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
संस्कारांचा वारसा
पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जनजागृतीतून शेतीच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, ही आता गरज बनली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्रामीण भाग हे संस्कारांचा वारसा जपणारे मोठे केंद्र आहे; त्यामुळे शेतकºयांचे आई-वडील वृद्धाश्रमात दिसत नाहीत, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.