कोल्हापूर : शासनाच्या कायाकल्प योजना २०२४-२०२५ या वर्षासाठी नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र गटात महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र विभागात आयसोलेशन आरोग्य केंद्राचा राज्यात द्वितीय क्रमांक आला. वैद्यकीय सेवा गुणात्मक आणि दर्जात्मक दिल्याने हा पुरस्कार शासनाने जाहीर केला आहे.पुरस्काराची रक्कम पंचगंगा रुग्णालयास १५ लाख तर आयसोलेशन आरोग्य केंद्रास दोन लाख रुपये मिळणार आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयास राज्यात प्रोत्साहनात्मक पुरस्कार म्हणून एक लाखांचे बक्षीस मिळणार आहे.राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातर्गंत शहरातील रहिवाशांसाठी वैद्यकीय सेवा चांगली मिळण्यासाठी कायाकल्प योजना राबविण्यात येते. महापालिकेच्या पंचगंगा व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल या नागरी सामुदायिक रुग्णालय आणि ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातर्फे राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. या योजनेंतर्गंत परिसर स्वच्छता, दर्जात्मक सेवा, स्वच्छ, आरोग्यदायी वातावरणात, आरोग्य सुविधा दिल्या जातात. यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. योजनेतून राज्य स्तरावरील समितीमार्फत रुग्णालयांचे मूल्यमापन झाले होते. सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, फुलेवाडी, सदरबाजार, सिद्धार्थनगर, मोरे-माने नगर या कायाकल्प योजनेत पात्र झाल्या आहेत. त्यांनाही प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस शासनाकडून देण्यात येणार आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी, उपायुक्त पंडित पाटील, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा-सुविधा देण्यात आल्या.
वैद्यकीय सेवा सुविधेत कोल्हापुरातील पंचगंगा, आयजीएम रुग्णालय राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:39 IST