कोल्हापूर : थकीत पाणीपट्टी असल्याने कनेक्शन बंदची कारवाई करीत असताना महापालिका वसुली पथकातील कर्मचाऱ्यांवर संशयित आरोपी रोहित विजय घोरपडे (वय ४३, रा. आहार हॉटेल शेजारी, मंगळवारपेठ, कोल्हापूर) याने मंगळवारी हल्ला केला.शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी आणि पीव्हीसी पाईपने मारहाण केल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ लिपिक उमेशचंद्र ज्योतिराम साळोखे (वय ५६, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घोरपडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, महापालिका पाणीपुरवठा विभागाची पाच पथके थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबवत आहेत. दरम्यान, सकाळी साडेनऊच्या सुमारास उमेश साळोखे हे आहार हॉटेल शेजारील सुधीर पेटकर यांच्या घरी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत गेले. पाणी बिल थकीत असल्याने ते पेटकर यांच्या घरातील पाण्याचे कनेक्शन कट करीत होते.त्यावेळी तेथे भाड्याने राहणारे रोहित घोरपडे यांनी आक्षेप घेत साळोखे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. अर्वाच्च शिवीगाळ करून अंगावर धावून जात साळोखे यांना ढकलून देत पीव्हीसी पाईपने मारहाण केली. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी साळोखे यांची सुटका करून घेतली. पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर संशयित आरोपी घोरपडे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर महापालिकेच्या वसुली पथकावर हल्ला; कर्मचाऱ्यास पाईप, लाथाबुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:32 IST