In Kolhapur, mass prayers will be closed from mosques and prayers will be offered from home | corona virus-कोल्हापुरात मशिदीतून सामूहिक नमाज बंद, घरातूनच नमाज अदा करणार

 कोल्हापुरातील शाहूपुरी स्टेशन रोडवरील शाहूपुरी थोरली मशीद कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून बंद ठेवण्यात आली./छाया : नसीर अत्तार

ठळक मुद्देकोल्हापुरात मशिदीतून सामूहिक नमाज बंद, घरातूनच नमाज अदा करणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचा एकत्रित निर्णय

कोल्हापूर : वाढत्या कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व मशिदींमध्ये केवळ सेवा करणारे पाच लोक नमाज पठण करतील, तर उर्वरित सर्व समाजबांधव घरातून नमाज पठण करतील.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मशिदी नमाज पठणासाठी बंद करण्याचा निर्णय जिम्मेदार मुफ्ती मौलाना उलमा व सर्व मस्जिदचे विश्वस्त आणि मुस्लिम समाजातील मान्यवरांना घेतला. यासंबंधीची बैठक बुधवारी मुस्लिम बोर्डिंग येथे झाली.

मुस्लिम समाजामध्ये पाच वेळेचे नमाज पठण करणे बंधनकारक आहे. मात्र, सध्याच्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये गर्दी करून नमाज पठण करणे धोक्याचे आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व मशिदींमध्ये सेवा करणारे लोक तेथे नमाज पठण करतील व उर्वरित सर्व समाजबांधव आपापल्या घरांतच नमाज पठण करतील. याकरिता त्या-त्या वेळेला ध्वनिक्षेपकावरून अजान दिली जाणार आहे. त्यानुसार समाजबांधवांनी नमाज पठण करावे. यासह दर शुक्रवारी होणारे नमाज पठण वरील निर्णयाप्रमाणे घरातूनच करावे, असे आवाहन सर्व मुफ्ती व मौलाना यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाला केले आहे.

या पार्श्वभूमीवर व मे महिन्यात येणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मशिदींची स्वच्छताही करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. समाजबांधवांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असेही आवाहन या बैठकीत करण्यात आले, अशी माहिती मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर व उपाध्यक्ष आदिल फरास, प्रशासक कादर मलबारी यांनी दिली.

यावेळी मौलाना इरफान, मौलाना मन्सूर, मौलाना बशीर, मौलाना अझर सय्यद, मुफ्ती फजलेकरीम, मुफ्ती फारूक, मुफ्ती ताहीर, हाफिज युनूस, मुफ्ती इरशाद, मुफ्ती गुफरान, हाजी जावेद, मौलाना नियाज, मौलाना इम्रान हाफिज आरिफ, मौलाना अब्दुलरऊफ, मौलाना आमीन, हाफिज तौफिक, हाजी इम्रान, हाजी इम्रान आळतेकर, हाजी उमर फारूक, हाजी दिलदार, हाजी सोहेल, हाजी समीर, हाजी मोहसीन बागवान, मुस्लिम बोर्डिंगचे संचालक रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, रफिक शेख, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: In Kolhapur, mass prayers will be closed from mosques and prayers will be offered from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.