शाहू छत्रपतींनी दाखवली संवेदनशीलता; सभा संपवून जाताना अपघातग्रस्त तरुणाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 22:03 IST2024-04-06T22:03:05+5:302024-04-06T22:03:18+5:30
शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी आपल्या वाहनातून तत्परतेने त्या जखमी युवकाला रुग्णालयात हलवले.

शाहू छत्रपतींनी दाखवली संवेदनशीलता; सभा संपवून जाताना अपघातग्रस्त तरुणाची मदत
दुर्वा दळवी
कोल्हापूर - लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती मतदार संघात प्रचार सभा घेत असून याचवेळी एका अपघातग्रस्त तरुणाला महाराजांनी मदत केली आहे. कोल्हापूरात लोकसभेसाठी रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती मतदार संघात प्रचार सभा घेत आहेत. याचवेळी एका अपघातग्रस्त तरुणाला महाराजांनी मदत केली असून त्यांच्या या कृतीचे कौतुक केलं जात आहे.
शनिवार रात्री साडेआठ- पावणे नऊच्या सुमारास महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे कानडेवाडी येथील सभा संपवून गडहिंग्लजकडे कारने निघाले होते. याच दरम्यान एका ठिकाणी रस्त्यावर दुचाकीस्वाराला अपघात होऊन जखमी युवक विव्हळताना दिसला. त्याला मदतीची गरज होती हे दृश्य पाहून शाहू महाराजांनी चालकाला तात्काळ गाडी घटनास्थळी थांबवायला सांगितली.
शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी आपल्या वाहनातून तत्परतेने त्या जखमी युवकाला रुग्णालयात हलवले. यानंतर डॉक्टरांशी जखमी युवकाच्या तब्येतीची विचारपूस करून ते गडहिंग्लजच्या सभेसाठी रवाना झाली. महाराजांनी दाखवलेली संवेशीलता यावेळी सर्वांनाच भावली असून या कृतीने कोल्हापूरकरांची मने जिंकून घेतली आहेत.