प्रदूषणात कोल्हापूर-इचलकरंजीचा वाटा ५२:२३ टक्के

By Admin | Updated: December 24, 2015 00:29 IST2015-12-24T00:21:40+5:302015-12-24T00:29:55+5:30

‘निरी’च्या अहवालाकडे दुर्लक्ष : देखरेख समितीचीही भयावह परिस्थितीकडे डोळेझाक

Kolhapur-Ichalkaran's contribution in pollution is 52:23 percent | प्रदूषणात कोल्हापूर-इचलकरंजीचा वाटा ५२:२३ टक्के

प्रदूषणात कोल्हापूर-इचलकरंजीचा वाटा ५२:२३ टक्के

अतुल आंबी- इचलकरंजी -बारा नाले, आठ औद्योगिक वसाहती, सात साखर कारखाने, पाच आसवण्या, तीन हजार लहान-मोठे उद्योगधंदे, कोल्हापूर व इचलकरंजी शहरांचे सांडपाणी यासह १७४ गावांचे सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाली आहे. यामध्ये काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले असले, तरी त्यातूनही बऱ्याचवेळा कमी-अधिक प्रमाणात सांडपाणी नदीत सोडले जाते.
पंचगंगा नदीमध्ये दुधाळी नाला, जयंती नाला, राजहंस नाला, रमन नाला, लाईन बाजार नाला, बापट कॅम्प, तिळवणी, तळंदगे, कबनूर, चंदूर, तसेच इचलकरंजीतील काळा ओढा या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मिसळत असल्याचा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थे (निरी)ने दिला आहे. या नाल्यांमधील पिवळे, काळे, ग्रे, काळपट अशा रंगांचे प्रदूषित पाणी वाहत असल्याचे म्हटले आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत ‘निरी’ या संस्थेने तेरा तपासण्या व प्रत्यक्ष पाहणी करून एप्रिल २०१४ ला सविस्तर अहवाल सादर केला. मात्र, आजतागायत कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही आणि विशेष म्हणजे ‘निरी’ च्या अहवालावर कोणत्याही प्रकारची चर्चाही घडवून आणली नाही. आजही कोल्हापूर शहरातून ९६ दशलक्ष लिटर, तर इचलकरंजी शहरातून ४० दशलक्ष लिटर सांडपाणी दिवसाला पंचगंगा नदीमध्ये सोडले जात आहे.
इचलकरंजी शहराला कृष्णा, पंचगंगा या माध्यमातून ५४ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. सध्या आणखीन एक ५४ एमएलडीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे आणि याबरोबरच कूपनलिकांद्वारेही पाणी उपसा केला जातो. घरगुती व औद्योगिक वापरामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय झाल्याने सांडपाणीही मोठ्या प्रमाणात नदीमध्ये सोडले जाते.
‘निरी’च्या अहवालावर अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती उच्च न्यायालयाने नेमली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, आयुक्त, मुख्याधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच ‘निरी’ च्या प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यांच्याकडूनसुद्धा प्रभावी काम होताना दिसत नाही.

या घटकांमधील मिसळते प्रदूषित पाणी
पंचगंगा नदीमध्ये शिरोली, लक्ष्मी, पार्वती, इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट, पंचतारांकित या औद्योगिक वसाहतींमधून औद्योगिक सांडपाणी सोडले जाते. त्याचबरोबर जवाहर, राजाराम, पंचगंगा, दत्त या साखर कारखान्यांमधूनही सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जाते. तसेच कोल्हापूर महानगरपालिका ५२ टक्के, इचलकरंजी नगरपालिका २३ टक्के प्रदूषणास जबाबदार आहे. औद्योगिक वसाहतींसह रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा, सर्व्हिसिंग स्टेशन, कत्तलखाने, मटन मार्केट, हॉटेल, खानावळी, धार्मिक सण, स्मशानभूमीतील राख, तसेच जनावरे धुणे, कपडे धुणे, वाहन धुणे अशा विविध घटकांतूनही होते प्रदूषण.
इचलकरंजीतील काळा ओढा अग्रेसर
इचलकरंजीत सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यांच्या व नगरपालिकेच्या म्हणण्यानुसार प्रकल्पातील पाणी शेतीला वापरले जाते. मात्र, तरीही इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी) व केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी) या चाचण्यांची अतिशय घातक पातळी ओलांडल्याचे ‘निरी’ने म्हटले आहे.
परीक्षणादरम्यानचे धक्कादायक निष्कर्ष
शिवाजी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मते, पिरळ ते प्रयाग या दरम्यान पाणी स्वच्छ दिसते. वळिवडे व परिसरामध्ये हिरवट रंग दिसतो, तर इचलकरंजी शहरापासून पुढे काळपट रंग दिसतो. तसेच दुधाळी नाल्यापासून पुढे पाण्याला वास येतो. कोल्हापूरच्या खालील भागात जास्त प्रमाणात घनपदार्थ विरघळलेले अढळतात. फॉस्फेटचे प्रमाणही जास्त आहे. गढुळता जास्त आहे. जैविक घटकांच्या विघटनासाठी प्रणवायूची मागणीही कोल्हापूरच्या खालच्या भागात जास्त आहे. रुईच्या पुढील भागात नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे.
दररोज ११६.९४ दशलक्ष लिटर मैलामिश्रित सांडपाणी
महानगरपालिकेची लोकसंख्या साडेपाच लाख, दररोजचा पाणी वापर १२० दशलक्ष लिटर, मैलामिश्रित सांडपाणी शंभर दशलक्ष लिटर, त्यातील फक्त तीस दशलक्ष लिटरवर प्रक्रिया केली जाते. तसेच इचलकरंजीची लोकसंख्या दोन लाख ९२ हजार, पाण्याचा वापर ५० दशलक्ष लिटर, मैलामिश्रित सांडपाणी ३८ दशलक्ष लिटर, त्यातील १४ दशलक्ष लिटरवर प्रक्रिया केली जाते व १७४ ग्रामपंचायतींची संख्या सात लाख १७ हजार, पाण्याचा वापर २८.३७ दशलक्ष लिटर, मैलामिश्रित सांडपाणी २२.९४ दशलक्ष लिटर असे ११६.९४ दशलक्ष लिटर मैलामिश्रित सांडपाणी दररोज पंचगंगा नदीमध्ये सोडले जाते.


माशांच्या जाती नष्ट
पंचगंगा नदीमध्ये विविध २५ जातींच्या माशांचा वावर होता. यातील ८० टक्के जाती नष्ट झाल्याचे दिसत आहे. तसेच प्रदूषित पाण्यामुळे एक नवीन जात उत्पन्न झाली आहे. ती जात इतर जलचर घटकांना खाते.

Web Title: Kolhapur-Ichalkaran's contribution in pollution is 52:23 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.