Kolhapur: कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला उच्चांकी गर्दी, पर्यटकांनी शहर गजबजले, झाली कोट्यवधीची उलाढाल
By संदीप आडनाईक | Updated: May 19, 2024 21:54 IST2024-05-19T21:53:56+5:302024-05-19T21:54:36+5:30
Kolhapur News: कोल्हापुरात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी करुन उच्चांक केला. शनिवार दि. १८ मे रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ६ पर्यंत ८७ हजार ३२६ तर रविवारी १ लाख ४२ हजार ८४५ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

Kolhapur: कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला उच्चांकी गर्दी, पर्यटकांनी शहर गजबजले, झाली कोट्यवधीची उलाढाल
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - कोल्हापुरात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी करुन उच्चांक केला. शनिवार दि. १८ मे रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ६ पर्यंत ८७ हजार ३२६ तर रविवारी १ लाख ४२ हजार ८४५ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. गेल्या दोन दिवसांत २ लाख ३० हजार १७१ भाविक अंबाबाई चरणी नतमस्तक झाले. ही आतापर्यंतची भाविकांची उच्चांकी गर्दी आहे. गेल्या आठवड्यात रविवारी तब्बल ७६ हजार १०४ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते.
सुट्या संपत आल्यामुळे भाविक आणि पर्यटकांच्या या वाढत्या मांदियाळीमुळे पर्यटन व्यवसायातून जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली आहे. शासकीय सुट्या, कॉलेज आणि शाळांना लागलेल्या सुट्या यामुळे कोल्हापुरात वाढलेल्या या गर्दीवर नियंत्रण करण्यात प्रशासन अपयशी ठरले. शहरातील सर्वच रस्ते गर्दीमुळे गजबजलेले होते. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे. अंबाबाई मंदिर परिसरात मुख्य दर्शनाबरोबरच मुखदर्शनासाठीही भाविकांची गर्दी होती. मुख्य दर्शनासाठी लागलेली रांग जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थानने मांडव घातला आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.
महाद्वार रोडवर खरेदीला उधाण
महाद्वार रोडवर रविवारी खरेदी करण्यासाठी भाविक तसेच पर्यटकांचे उधाण आले होते. सौंदर्य प्रसाधने, छोट्या पर्ससोबत कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी मसाले यांच्या खरेदीकडे तसेच इतर खाद्यपदार्थांकडेही भाविक आणि पर्यटकांचा कल होता. महालक्ष्मी धर्मशाळा परिसरात तसेच भवानी मंडप, सबजेलकडील रस्त्यावर फेरीवाले, छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे खरेदी केली. धार्मिक विधीसाठी लागणारे नारळ, हार, फुले, गंध, हळद, कुंकू, खणविक्री करणाऱ्या दुकानदारांकडे गर्दी होती. याशिवाय मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने शहरातील खासगी यात्री निवास, धर्मशाळा, तसेच घरगुती राहण्याची ठिकाणेही हाऊसफुल होती. यातूनही मोठी आर्थिक उलाढाल झालेली आहे.
पार्किंगची समस्या कायम...
महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाइन, पापाची तिकटी तसेच चौकाचौकात सिग्नलवर वाहने थांबून राहिली. गर्दी वाढल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या परिसरात ड्रेनेजचे काम सुरू असल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती. पार्किंगची नीट व्यवस्था होत नसल्यामुळे अनेकांनी चारचाकीसाठी रिकामे मैदान, हॉटेल, लॉजबाहेरच्या जागेचाच आसरा घेतला.
न्यू पॅलेस, रंकाळा परिसरात गर्दी
सुटीला जोडून बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे कोल्हापूर हाऊसफुल झाले होते. पर्यटकांनी नातेवाइकांसोबत न्यू पॅलेस, भवानी मंडप, महाद्वार रोड, रंकाळा परिसरात वेळ घालवला. पुणे, मुंबईहून आलेल्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई देवी, जोतिबा डोंगर, किल्ले पन्हाळगड, नरसोबाची वाडी, कणेरी या ठिकाणांना भेट दिली.