कोल्हापूर तापले, पारा ३६ अंश सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:06 IST2021-03-01T21:06:25+5:302021-03-01T21:06:57+5:30
Temperature Kolhapur- मार्च महिन्याचा पहिला दिवस कोल्हापूरकरांसाठी अंग भाजून काढणारा आणि आगामी उन्हाळ्याची दाहकता दाखविणारा ठरला. आतापर्यंत ३० ते ३२ अंशांवर असणारा तापमानाचा पारा सोमवारी अचानक ३६ अंशांवर गेल्याने कोल्हापूरकरांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागला.

कोल्हापूरचा तापमानाचा पारा सोमवारी या हंगामात पहिल्यांदाच ३६ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या चटक्यांनी सर्वच जण घामेघूम झाले. उन्हापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर, डोक्यावर असे स्कार्फ गुंडाळून घ्यावे लागले. (छाया : आदित्य)
कोल्हापूर : मार्च महिन्याचा पहिला दिवस कोल्हापूरकरांसाठी अंग भाजून काढणारा आणि आगामी उन्हाळ्याची दाहकता दाखविणारा ठरला. आतापर्यंत ३० ते ३२ अंशांवर असणारा तापमानाचा पारा सोमवारी अचानक ३६ अंशांवर गेल्याने कोल्हापूरकरांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागला.
गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल जाणवत असून, थंडीपासून उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. रात्रीचे तापमान कमी जास्त होत आहे. सकाळी मात्र आल्हाददायक गारवा असतो. शनिवार, रविवारी अधेमध्ये ढगाळ वातावरणही होत होते. सोमवारी दिवसभर आभाळ पूर्ण निरभ्र झाले. परत पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण सुरू असल्याने वातावरण कोंदट झाले.
कोल्हापुरात रात्रीचे तापमान कमाल २४ अंशांवर गेले आहे. दिवसाचे तापमानही २७ वरून वाढत जाऊन ते दुपारी १२ वाजता ३५ अंशांपर्यंत गेले. दुपारी एक ते तीन या दरम्यान, तर पारा ३६ अंशांवर पोहोचल्याने कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत होती. थंडाव्यासाठी प्रत्येकजण सावलीचा आडोसा शोधताना दिसत होता. डोके तापत असल्याने डोक्यावर कापड गुंडाळून घेतले जात होते. तहान शमविण्यासाठी सरबत, कलिंगड, आइस्क्रीम विक्रीच्या दुकानांकडे पावले वळत होती.