कोल्हापूर : शेतकऱ्यांना लाचार करण्याचा सरकारचा प्रयत्न : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:34 IST2018-03-12T17:34:32+5:302018-03-12T17:34:32+5:30
शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

कोल्हापूर : शेतकऱ्यांना लाचार करण्याचा सरकारचा प्रयत्न : राजू शेट्टी
कोल्हापूर : शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईत धडकला आहे. मागण्यांवर शेतकरी ठाम असून, सरकारची अडचण झाली आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता, शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.
शेट्टी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत.
शेतकऱ्यांना लाचार करायचे, एवढेच काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. आतापर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आमचे प्रश्न व मागण्या मांडत होतो. त्याची दखलही सरकारने घेतली नाही. तुम्ही दादच देणार नसाल तर शेतकरी आक्रमक होणारच. बळीराजाच्या जिवावर सत्ता भोगताय. त्यांनाच पायदळी तुडवाल तर याद राखा. सरकारला गुढगे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोका
शेतकरी मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करीत आहेत म्हणजे काहीतरी धोका वाटतो. याचा अनुभव आम्हाला आल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.