कोल्हापूर : शिंगणापूर विद्यानिकेतनचा पाच कोटींचा विकास आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:09 AM2018-11-17T11:09:39+5:302018-11-17T11:11:13+5:30

शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतनचा पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत.

Kolhapur: Five-acre development plan of Shinganapur Vidyaniketan | कोल्हापूर : शिंगणापूर विद्यानिकेतनचा पाच कोटींचा विकास आराखडा

कोल्हापूर : शिंगणापूर विद्यानिकेतनचा पाच कोटींचा विकास आराखडा

Next
ठळक मुद्देशिंगणापूर विद्यानिकेतनचा पाच कोटींचा विकास आराखडाअमन मित्तल यांनी केली पाहणी, स्पोर्टस स्कूल होणार विकसित

कोल्हापूर : शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतनचा पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत.

मित्तल यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांना सोबत घेऊन शुक्रवारी शिंगणापूर शाळा परिसराची पाहणी केली. या ठिकाणी नऊ एकर जागा असून येथे मोठे मैदान, वसतिगृह आणि स्पोर्टस स्कूल विकसित करण्यात येणार आहे.

गेली अनेक वर्षे ज्ञानदान करणाऱ्या या शाळेला निवासी क्रीडा प्रशालेचे स्वरूप देण्यामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष रस घेतला होता. तत्कालीन मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी गणेश पाटील यांनीही या नियोजनामध्ये सहभाग घेतला होता. यानंतर डॉ. कुणाल खेमनार यांनी सातत्याने या शाळेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. तरीही मधल्या काळामध्ये मैदान, ट्रॅक, इनडोअर गेम्स सुविधा या बाबतींत फारशा सुधारणा झाल्या नाहीत.

मित्तल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर या शाळेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली असून, त्यांनी आर्किटेक्टना सोबत घेऊनच शुक्रवारी या शाळेची आणि परिसराची पाहणी केली. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, इनडोअर गेम्ससाठी कॉम्प्लेक्स, मैदान, ट्रॅक, आदी सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा विकास आराखडा पूर्ण केल्यास या शाळेचे रूपच बदलून जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील सव्वाशे मुले, मुली या ठिकाणी निवासी प्रशिक्षण आणि अध्ययन करीत असून, विविध स्तरांवरील क्रीडा स्पर्धांमध्ये धवल यश संपादन करीत आहेत.

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन

या शाळेतून गेल्या अनेक वर्षांमध्ये बाहेर पडलेले विद्यार्थी आज देश-विदेशामध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. अगदी ज्ञानेश्वर मुळे यांच्यापासून ते ‘म्हाडा’चे अशोक पाटील यांच्यापर्यंत अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. या सर्वांना स्नेहमेळाव्यानिमित्ताने एकत्र केले जाणार आहे. हा स्नेहमेळावा या शाळेतच घ्यावा, अशी सूचना मित्तल यांनी संबंधित संयोजकांना केली आहे.

 

अतिशय चांगली क्रीडाशाळा म्हणून या विद्यानिकेतनचा नावलौकिक आहे. या ठिकाणी सर्व सुविधा देऊन येथे अद्ययावत क्रीडा सुविधा देण्याचा मानस आहे. यासाठी शुक्रवारी आपण पाहणी केली असून, संबंधितांना विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अमन मित्तल
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
 

 

Web Title: Kolhapur: Five-acre development plan of Shinganapur Vidyaniketan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.