कोल्हापूर : खनिकर्म अधिकारी, उपवनसंरक्षकाच्या दुर्लक्षाने बॉक्साईटचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:47 IST2018-12-11T11:44:55+5:302018-12-11T11:47:14+5:30
मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील पंडितराव माईन्स या बॉक्साईट खाणीवर बंदी असतानाही तेथून सर्रास उत्खनन होऊन वाहतूक होत आहे.

कोल्हापूर : खनिकर्म अधिकारी, उपवनसंरक्षकाच्या दुर्लक्षाने बॉक्साईटचे उत्खनन
कोल्हापूर : मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील पंडितराव माईन्स या बॉक्साईट खाणीवर बंदी असतानाही तेथून सर्रास उत्खनन होऊन वाहतूक होत आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी व उपवनसंरक्षक यांच्याकडे कारवाईसंदर्भात मागणी करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सोमवारी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला.
जनता दलाचे कार्यकर्ते रवी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर केले. गावातील बॉक्साईट खाणीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदी आहे, असे असताना संबंधित कंपनी व व्यवस्थापकांच्याकडून सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे २६ डिसेंबरपासून आतापर्यंत दररोज ४०० ते ८०० ट्रकमधून बॉक्साईटची वाहतूक केली जात आहे.
त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यासह परिसरातील जंगलातील जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. याबाबत कारवाई करण्यासाठी खनिकर्म विभाग, वनविभाग, भूविज्ञान व खनिकर्म संचलनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, भुदरगड तहसीलदारांना भेटून कळविले आहे.
प्रत्येक विभागाने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच बोट करून त्यांनाच कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
शिष्टमंडळात संजयसिंह देसाई, संग्रामसिंह देसाई, अभिजित भोसले, संदीप देसाई आदींसह ग्रामस्थांचा समावेश होता.