कोल्हापूर : ‘अवती-भवती’ चित्रप्रदर्शन रविवारपासून, ५० कलाकृती, प्रदर्शन १७ तारखेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:21 IST2018-03-07T17:21:20+5:302018-03-07T17:21:20+5:30
कोल्हापूर येथील गुरू-शिष्य परिवारातर्फे प्रसिद्ध चित्रकार विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे ‘अवती-भवती’ हे प्रदर्शन रविवार (दि. ११)पासून राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.

कोल्हापूर : ‘अवती-भवती’ चित्रप्रदर्शन रविवारपासून, ५० कलाकृती, प्रदर्शन १७ तारखेपर्यंत
कोल्हापूर : येथील गुरू-शिष्य परिवारातर्फे प्रसिद्ध चित्रकार विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे ‘अवती-भवती’ हे प्रदर्शन रविवार (दि. ११)पासून राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
रेखासम्राट टी. के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगांवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार, विलास बकरे, कॅडसन लॅबचे शशिकांत कदम, डॉ. संदीप पाटील, कोल्हापूर वुई केअरचे मिलिंद धोंड, प्राचार्य अजेय दळवी उपस्थित असतील.
चित्रकला, रंगावली, छायाचित्र, लेखन अशा विविध कलाक्षेत्रांसह समाजसेवेतही ठसा उमटवलेल्या विजय टिपुगडे यांच्या ‘अवती-भवती’ या चित्रप्रदर्शनातील कलाकृती मराठी मातीचे विलोभनीय दर्शन घडणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेला निसर्ग, गर्द वनराई, खळाळते धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मातीशी इमान सांगणारे ग्रामीण जीवन याचे तितकेच पारदर्शी नितळ रूप कलाकृतींत साकारले आहे. कोकणचा समुद्रकिनारा, माडाची झाडे, तरंगत्या होड्यांची भुरळ सगळ्यांनाच पडते. हा लोभस कोकणही चित्रांंतून साकार झाला आहे.
अचूक, वास्तवदर्शी रेखाटन, पारदर्शी जलरंगाचे ओघवते लेपन ही वैशिष्ट्ये घेऊन या ५० कलाकृती साकारल्या आहेत. हे प्रदर्शन १७ तारखेपर्यंत सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ या कालावधीत खुले राहणार असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.