कोल्हापूर : आठ वर्षांत पोलिसांच्या हातांवर १७ आरोपींनी दिल्या तुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:25 IST2018-05-19T11:25:27+5:302018-05-19T11:25:27+5:30
गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १७ आरोपी हे पोलीस कोठडी, न्यायालय आवार, मध्यवर्ती बसस्थानक आवार, सीपीआर आवारामधून पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोपींपैकी एकाचा इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू झाला आहे. यापूर्वी २०११ ला हुपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपी पळाले होते. सर्वाधिक लक्ष्मीपुरी व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दींतून पोलिसांच्या हातून आरोपी पलायनाच्या घटना घडल्या आहेत.

कोल्हापूर : आठ वर्षांत पोलिसांच्या हातांवर १७ आरोपींनी दिल्या तुरी
कोल्हापूर : गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १७ आरोपी हे पोलीस कोठडी, न्यायालय आवार, मध्यवर्ती बसस्थानक आवार, सीपीआर आवारामधून पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोपींपैकी एकाचा इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू झाला आहे. यापूर्वी २०११ ला हुपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपी पळाले होते. सर्वाधिक लक्ष्मीपुरी व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दींतून पोलिसांच्या हातून आरोपी पलायनाच्या घटना घडल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पोलीस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून घरफोडी व लूटमारीच्या गुन्ह्यांतील चार आरोपींनी शुक्रवारी पहाटे पलायन केले आहे. जिल्ह्यात सध्या ३२ पोलीस ठाणी आहेत. त्यांपैकी राजारामपुरी, करवीर, शिवाजीनगर, मुरगूड, गांधीनगर, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे, कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ, आदी पोलीस ठाण्यांत कोठड्या आहेत; पण शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस कोठड्या मर्यादित जागेमध्ये आहेत.
तसेच शाहूपुरी, इस्पुर्ली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलीस ठाणे अशा बहुतांश ठिकाणी पोलीस कोठड्या आहेत. सध्या कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा या तीन पोलीस ठाण्यांच्या आरोपींना राजारामपुरी व करवीर पोलीस ठाण्यांत ठेवण्यात येते.
तसेच शहरामध्ये असणारी करवीर महिला पोलीस कोठडीची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे महिला आरोपींना राजारामपुरी व मुरगूड पोलीस ठाण्यांत न्यावे लागते. बहुतांश आरोपी हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील होते. दरम्यान, पलायन केलेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांपैकी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवरून उडी मारलेल्या आरोपीचा मृत्यू झाला आहे.
(पोलीस ठाणे : पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेली माहिती)
२०१०
मुरगूड (शौचालयाला नेत असताना)
२०११
हुपरी (पोलीस ठाण्याच्या कोठडीतून)
जुना राजवाडा (बिंदू चौक सबजेलजवळून)
शाहूपुरी (न्यायालयाच्या आवारातून)
२०१२
शिवाजीनगर (इचलकरंजी)
२०१३
कोडोली,
शाहूपुरी,
लक्ष्मीपुरी,
जुना राजवाडा (बालकल्याण संकुल)
२०१४
शिवाजीनगर (आरोपी पॅरोलवर असताना )
पन्हाळा (न्यायालय आवारातून)
कागल
२०१५
लक्ष्मीपुरी (सीपीआर आवारातून)
२०१६
लक्ष्मीपुरी (सीपीआर कैदी वॉर्डमधून),
राधानगरी (न्यायालय आवारातून)
२०१७
शाहूपुरी (मध्यवर्ती बसस्थानक प्रवास करताना )
लक्ष्मीपुरी (सीपीआरमधून)