कोल्हापूर : दिलबहार(अ) ची ‘संध्यामठ’वर एकतर्फी मात, के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग; निखिल जाधवचे दोन गोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:47 IST2018-01-08T15:44:17+5:302018-01-08T15:47:10+5:30
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले. शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला.

कोल्हापूर : दिलबहार(अ) ची ‘संध्यामठ’वर एकतर्फी मात, के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग; निखिल जाधवचे दोन गोल
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले.
शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला.
सामन्यांच्या सुरुवातीपासूनच ‘दिलबहार’कडून सनी सणगर, जावेद जमादार, किरण चोकशी, इमॅन्युअल इचिबेरी, निखिल जाधव यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे तिसऱ्या मिनिटास सनी सणगरच्या पासवर निखिल जाधवने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.
या गोलनंतर ‘संध्यामठ’कडून आशिष पाटील, सौरभ हारुगले, मोहित मंडलिक, सतीश अहीर, अजिंक्य गुजर, शाहू भोईटे यांनीही सामन्यात बरोबरी करण्यासाठी वेगवान चाली रचल्या. मात्र, ‘दिलबहार’च्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
‘दिलबहार’कडून किरण चोकशीच्या पासवर इमॅन्युअल इचिबेरी, निखिल जाधव यांच्या संधी वाया गेल्या; तर ‘संध्यामठ’कडून अजिंक्य गुजरच्या पासवर सतीश अहीरच्या दोन संधी वाया गेल्या. ३८ व्या मिनिटास ‘दिलबहार’कडून इमॅन्युअल इचिबेरीने दिलेल्या पासवर निखिल जाधवने संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवीत आघाडी भक्कम केली.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे के. एस. ए.तर्फे रविवारी सायंकाळी शाहू छत्रपती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शाहू छत्रपती यांनी केक कापला. यावेळी खासदार संभाजीराजे, दीपक शेळके, सरदार मोमीन, माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तरार्धात ‘संध्यामठ’कडून शाहू भोईटे, अजिंक्य गुजरच्या पासवर सौरभ हारुगलेची संधी वाया गेली; तर ‘दिलबहार’कडून किरण चोकशीचा फटका गोलपोस्टवरून गेल्याने गोल करण्याची संधी वाया गेली. तसेच त्यांच्याकडून आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्न झाला.
मात्र, सजग असलेल्या ‘संध्यामठ’च्या बचावफळीने त्यांचे आघाडी वाढविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरविले. अखेरच्या काही क्षणांत ‘दिलबहार’कडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. अखेरीस हा सामना २-० या गोलसंख्येवर दिलबहार (अ)ने जिंकला.
स्पर्धेच्या मध्यंतरामध्ये के.एस.ए.चे पेट्रन चीफ शाहू छत्रपती यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजे, के.एस.ए.चे अध्यक्ष सरदार मोमीन, माणिक मंडलिक, संभाजी मांगोरे-पाटील, नितीन जाधव, संजय पोरे, झुंजार सरनोबत, दीपक शेळके, बाबा पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.