कोल्हापूर : जिल्ह्यात यंदा जूनमध्ये जोरदार पाऊस झाल्याने गेल्या चार वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जून मध्येच वार्षिक सरासरीच्या २३ टक्के पाऊस झाला असून, कागल तालुक्यात सर्वाधिक ४५ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे धरणक्षेत्रात रेकाॅर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे.मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. जूनमध्ये मान्सून वेळेत सक्रिय झाला आणि त्याने थांबण्याचे नावच घेतले नाही. गेली महिनाभर शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना पावसाने मेटाकुटीला आणले आहे. खरिपाच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्केच खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने भुईमुगासह इतर पेरण्या सुरू झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक पाऊस यंदा जूनमध्ये झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १८८१ मिलिमीटर असून, जून महिन्यात ३९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या २३ टक्के, तर जूनच्या सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे.धरणक्षेत्रातही यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. यंदा धरणक्षेत्रात जून महिन्यात सरासरी १३७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद झाली आहे.
रोप लागणीचे क्षेत्र वाढलेजिल्ह्यात भाताच्या निम्या क्षेत्रावर धूळवाफ पेरण्या होतात. मात्र, यंदा भाताच्या जेमतेम ३५ ते ४० टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे भाताच्या रोप लागणीचे क्षेत्र वाढणार आहे.
जिल्ह्यातील तुलनात्मक पाऊस मिलिमीटरमध्ये असा..वार्षिक सरासरी - जूनची सरासरी - प्रत्यक्षात झालेला पाऊस१८८१ - ३६२ - ३९२
धरणक्षेत्रातील जूनमधील तुलनात्मक पाऊस..धरण - गेल्यावर्षीचा - यंदाचा
- राधानगरी - ७६४ - १६३९
- तुळशी - ४७० - १२२३
- वारणा - ५०५ - १११०
- दूधगंगा - ६३३ - १५३०
- कासारी - ८७० - १२५४
- कडवी - ५८० - १०२०
- कुंभी - ९२७ - ११३७
- पाटगाव - १४७६ - १९७२