कोल्हापूर जिल्ह्यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही, सहा संवेदनशील केंद्रे

By उद्धव गोडसे | Published: April 10, 2024 04:20 PM2024-04-10T16:20:29+5:302024-04-10T16:21:31+5:30

चोख बंदोबस्ताचे नियोजन, गरजेनुसार बाहेरून बंदोबस्त मागविणार

Kolhapur district has no nuisance polling station, six sensitive polling stations | कोल्हापूर जिल्ह्यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही, सहा संवेदनशील केंद्रे

कोल्हापूर जिल्ह्यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही, सहा संवेदनशील केंद्रे

उद्धव गोडसे

कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही. मात्र, एकाच उमेदवाराला ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले संवेदनशील स्वरुपाचे सहा केंद्र जिल्ह्यात आहे. त्यावर शासकीय यंत्रणांची करडी नजर राहणार असून, जिल्ह्यातील ३३५९ मतदान केंद्रांसाठी कडेकोट बंदोबस्त पुरविण्याचे नियोजन पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

देशात काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणे, बोगस मतदान करणे, मतदान यंत्रणा गायब करणे असे प्रकार घडतात. कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत असे गंभीर प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडते. जिल्ह्यात एकाही उपद्रवी मतदान केंद्राची नोंद नाही. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार एखाद्या केंद्रावर एकाच उमेदवारास ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यास ते केंद्र संवेदनशील मानले जाते. एकाच उमेदवारास मोठ्या प्रमाणात मतदान होण्यामागे दबावतंत्राचा वापर होतो काय किंवा काही गैरप्रकार होतो काय ? यावर निवडणूक आयोगाकडून नजर ठेवली जाते. अशा प्रकारची सहा केंद्रे जिल्ह्यात आहेत.

३८ केंद्रांची वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ३३२१ मतदान केंद्रे होती. यात ३८ केंद्रांची वाढ झाली असून, यंदा ३३५० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार वाढीव बंदोबस्ताचे नियोजन पोलिसांकडून सुरू आहे.

पाच हजार मनुष्यबळ लागणार

२०१९ मधील निवडणुकीत तीन हजार पोलिस आणि २७०० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते. यावेळी मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे वाढीव बंदोबस्त लागणार आहे. तसेच शीघ्र कृती दल, दंगल काबू पथकेही तैनात केली जाणार आहेत. सुमारे पाच हजार मनुष्यबळाची गरज असल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ बाहेरच्या जिल्ह्यातून मागविले जाणार आहे. बंदोबस्ताचे नियोजन दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

जिथे चुरस तिथे विशेष खबरदारी

चुरशीने मतदान होणारी काही गावं जिल्ह्यात आहेत. अशा ठिकाणी दोन गट आमने-सामने येऊन अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अशा गावांची स्वतंत्र यादी करून पुरेसा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

Web Title: Kolhapur district has no nuisance polling station, six sensitive polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.