कोल्हापूर :  वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:45 PM2019-01-09T13:45:41+5:302019-01-09T13:49:45+5:30

वीज दरवाढ कमी करण्यासाठी एकजुटीने तीव्र लढा देण्याचा निर्धार जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीज दरवाढविरोधी राज्यस्तरीय परिसंवादामध्ये उद्योजक, शेतकरी, आदी घटकांच्या वतीने करण्यात आला. वीज दरवाढ तत्काळ कमी करावी; उद्योगक्षेत्रासाठी वीज अनुदान द्यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Kolhapur: The determination to fight united against the power hike | कोल्हापूर :  वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार

कोल्हापुरात जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीजदरवाढ विरोधी परिसंवादात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी बी. जी. मांगले, रमेश पोवार, प्रताप होगाडे, चंद्रकांत जाधव, लक्ष्मीदास पटेल, राजू पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्दे वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार१५ फेब्रुवारीपूर्वी राज्यव्यापी बैठक; जागर फौंडेशनतर्फे परिसंवाद

कोल्हापूर : वीज दरवाढ कमी करण्यासाठी एकजुटीने तीव्र लढा देण्याचा निर्धार जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीज दरवाढविरोधी राज्यस्तरीय परिसंवादामध्ये उद्योजक, शेतकरी, आदी घटकांच्या वतीने करण्यात आला. वीज दरवाढ तत्काळ कमी करावी; उद्योगक्षेत्रासाठी वीज अनुदान द्यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी सभागृहात राज्यस्तरीय परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे होते. या परिसंवादात वीजतज्ज्ञ, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सहभागी झाले. वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, राज्य सरकारने ३४०० कोटींची तातडीची मदत म्हणून अनुदान देण्याची गरज आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अशा पद्धतीने तातडीची मदत म्हणून सहा हजार कोटींचे अनुदान दिले होते. वीजनिर्मिती, खरेदी, गळती आणि प्रशासकीय खर्चात कपात जर केली नाही, तर महावितरण भविष्यात निश्चित बंद पडेल. वीज दरवाढीविरोधात राज्यव्यापी लढ्याची दिशा ठरविण्यासाठी दि. १५ फेब्रुवारीपूर्वी सर्व जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजकांची बैठक घेण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले, वीजदरवाढीबाबतच्या लढ्यात माझा पूर्ण ताकदीने सहभाग राहील. सरकारला वीजदर कमी करावाच लागेल. ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, डिमांड चार्जेस कमी व्हावेत. वीज दरवाढीमुळे उद्योग चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उद्योगमंत्र्यांनी दरवाढीचा फेरविचार करावा.

अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, वीजदरवाढ मागे घेण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्या दृष्टीने सर्व घटकांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. ‘जागर फौंडेशन’चे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वीजदरवाढ मागे घेण्यासाठी उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, आदी घटकांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे. या लढ्यात ‘जागर फौंडेशन’ सहभागी राहील.

या परिसंवादात ‘कोल्हापूर चेंबर’चे माजी अध्यक्ष आनंद माने, ‘गोशिमा’चे राजू पाटील, ‘मॅक’चे हरिश्चंद्र धोत्रे, निवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पारस ओसवाल, अरुण पाटील, गुलाबराव घोरपडे, रमेश पोवार, बाबासाहेब देवकर, प्रसाद बुरांडे, गोपाळ पटेल, नंदकुमार गोंधळी, सचिन तोडकर, अप्पासाहेब धनवडे, चंद्रकांत कांडेकरी, रितू लालवाणी, आदी उपस्थित होते. पीटर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सम्राट गोंधळी यांनी आभार मानले.

कोण, काय, म्हणाले?

  1. आनंद माने (कोल्हापूर चेंबर) : शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी अधिक खर्च होत असल्याचे सांगून महावितरणकडून वीज दरवाढ केली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योग चालविण्याची कसरत करावी लागत आहे. शेजारील राज्यांच्या बरोबरीने आपल्या राज्यात वीजदर असणे आवश्यक आहे.
  2. राजू पाटील (स्मॅक) : महावितरणने पॉवर फॅक्टर पेनल्टीचा भार उद्योजक आणि ग्राहकांवर लादू नये. वीज दरवाढ मागे घ्यावी.
  3. उज्ज्वल नागेशकर (हॉटेल मालक संघ) : हॉटेल व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार वीजदर लागू करणे, सवलती, अनुदान देणे आवश्यक आहे.
  4. विक्रांत पाटील (इरिगेशन फेडरेशन) : शेतकरी, उद्योजकांचे म्हणणे ऐकत नसेल, तर वीज नियामक आयोगाची आम्हाला गरज नाही.
  5. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात वीजगळती कमी असून बिलाची वसुली अधिक आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील तोटा भरून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. ऊर्जामंत्र्यांचा पश्चिम महाराष्ट्रावर राग आहे.

 

 

Web Title: Kolhapur: The determination to fight united against the power hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.