लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर फिरत्या खंडपीठाचे (सर्कीट बेंच) कामकाज सोमवारपासून सुरू होणार असले तरी या खंडपीठावर कामकाजाचा मोठा ताण असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयातूनकोल्हापूर फिरत्या खंडपीठाकडे सुमारे १ लाख २० हजार प्रकरणे वर्ग केली असून त्यात १५ निवडणूक याचिकांचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या फिरत्या खंडपीठाच्या अधिकारक्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील १३ सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ते कोल्हापूर खंडपीठात सरकारची बाजू मांडतील. सहा जिल्ह्यांमधील टॅक्ससंबंधी आणि निवडणूक याचिका १८ ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करून घेणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
७९ प्रकरणे सूचिबद्ध
कामकाजाच्या पहिल्याच दिवशी न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे ७९ प्रकरणे सूचिबद्ध करण्यात आली आहेत. तर न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठापुढे ७४ आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या एकलपीठापुढे १४७प्रकरणे सूचिबद्ध करण्यात आली आहेत.
वर्ग झालेल्या याचिका
- २०२२ मध्ये शोमिका महाडिक यांनी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका.
- त्याचवर्षी बंटी पाटील यांच्याविरोधात राजवर्धन विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचीही याचिका.
- २०२४ मध्ये विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाविरोधात केलेली याचिका.
- २०२५ मध्ये शशिकांत खोत यांनी अंमल महादेवराव महाडिक यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका.
- पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले
- प्रशांत यादव विरुद्ध शेखर निकम
- ज्योतीप्रभा पाटील विरुद्ध उदय सामंत
- राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके
- शशिकांत शिंदे विरुद्ध महेश संभाजीराजे शिंदे
- नरसय्या आडम विरुद्ध देवेंद्र कोठे
- विक्रमसिंग सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर
- राजू आवळे विरुद्ध अशोकराव माने चेतन नरोटे विरुद्ध देवेंद्र कोठे
- महेश कोठे विरुद्ध विजयकुमार देशमुख
- सिद्धराम म्हेत्रे विरुद्ध सचिन कल्याणशेट्टी