कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेच्या अधिकाराला आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी निकाली काढली. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. या निवडणुका विशिष्ट मुदतीत घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने या प्रक्रियेत आता हस्तक्षेप करता येणार नाही. आवश्यकता वाटल्यास निवडणुकीनंतर स्वतंत्र याचिका दाखल करता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत गेले महिनाभर सुनावण्या सुरू होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, करवीर आणि आजरा तालुक्यातील प्रभाग रचनेबद्दल याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तीनही याचिकांचे कामकाज एकत्रच सुरू होते. यातील एका याचिकेमध्ये प्रभाग रचनेच्या अधिकारालाच आक्षेप घेण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने जरी प्रभाग रचनेचे अधिकार महाराष्ट्र शासनाला दिलेले असले तरीही जो अधिकारी ही रचना अंतिम करतो तोच त्यावरील आक्षेपांवर निर्णय कसा घेवू शकतो असा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला होता. यावर याआधी याचिकाकर्ते, महाराष्ट्र शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली होती. या याचिकेला निकाल दुपारी लागणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यानुसार दुपारी तीननंतर ही याचिका निकाली काढण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा, प्रभाग रचना अधिकाराला आक्षेप घेणारी याचिका निकाली
By समीर देशपांडे | Updated: September 30, 2025 17:38 IST