कोल्हापूर मोठी बाजारपेठ : जिल्ह्यात दरवर्षी ३० किलोचे तीन लाख रवे रुचतात; ८०० हून अधिक गुऱ्हाळघरे

By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T22:34:44+5:302014-08-31T23:35:55+5:30

सणाचा गोडवा, गुळासंगे वाढवा!

Kolhapur big market: Every year 30 lakh 3 lakh sights lie in the district; More than 800 gardens | कोल्हापूर मोठी बाजारपेठ : जिल्ह्यात दरवर्षी ३० किलोचे तीन लाख रवे रुचतात; ८०० हून अधिक गुऱ्हाळघरे

कोल्हापूर मोठी बाजारपेठ : जिल्ह्यात दरवर्षी ३० किलोचे तीन लाख रवे रुचतात; ८०० हून अधिक गुऱ्हाळघरे

सचिन भोसले - कोल्हापूर =गणेशोत्सव, दिवाळी, पाडवा, बैलपोळा असो की नागपंचमी... सणाचा गोडवा वाढविण्यासाठी गुळाचा वापर अनिवार्य आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील ग्रामीण भागात भर उन्हात कोणी पाहुणा घरी आला की, त्याला गुळाचा एक खडा व पाणी देण्याची पद्धत आजही आहे. कोल्हापूरला ३० किलो वजनाचे दरवर्षी तीन लाख रवे लागतात, तर कोल्हापूर परिसरातून २७ लाख रव्यांची आवक होते, असा हा गुळाचा गोडवा जाणून घेऊ ‘लोकमत’संगे.
‘गूळ’ प्रामुख्याने आशिया व आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. आपल्याकडे केवळ उसापासून गूळ तयार केला जातो; पण अरब देशांत खजूर, नारळाच्या झाडापासूनही गूळनिर्मिती केली जातो. ज्या देशात साखरेचे उत्पादन घेतले जाते, त्या देशात हमखास गूळ तयार केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातही ८००पेक्षा जास्त गुऱ्हाळघरे आहेत. त्यामध्ये प्रथम घाणा मशीनवर उसाचा रस काढून तो शुद्ध करून ठरावीक तापमानाला उकळून मोठ्या लोखंडी काहिली पात्रात ओतला जातो. त्यावर प्रक्रिया करून गूळ तयार केला जातो. कोल्हापुरातील गुळाला भारताबरोबर युरोप, आशियाई देशांमध्ये मोठी मागणी आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे गुळाची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. त्याखालोखाल विशाखापट्टणम्मधील अन्नकपाली, कर्नाटकातील मंड्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या बाजारपेठेचाही समावेश होतो.

गुळाचा वापर असाही
गुळाचे महत्त्व फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांतही आहे. प्रांतानुसार गुजरातमध्ये प्रत्येक पदार्थात गुळाचा वापर केला जातो. दक्षिण भारतात खिरीबरोबर रस्सम सांबरामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाचा वापर होतो. गुजराती समाजामध्ये (गूळधना) गुळाचे बारीक खडे व धणे एकत्र करून साखरपुड्यामध्ये वाटले जातात. दक्षिण भारतात पदार्थाचा समतोल राखण्यासाठी गूळ वापरतात. आंध्र प्रदेशात ‘चक्र पोंगल’ नावाचा पदार्थ जो दूध, गूळ व तांदूळ एकत्र करून बनवतात. संक्रांतीदिवशी ‘अरिसालू’ हा पदार्थ तिथे बनवला जातो. केरळमध्ये गूळ (पायसम) म्हणजे देवाची देणगी मानतात. तमिळनाडूमध्ये शेतामध्ये पिकांची नव्याने पेरणी केली जाते, तेव्हा ‘कल्ही’ नावाच्या पदार्थात गूळ वापरून देवाला नैवेद्य करण्याची पद्धत रूढ आहे. ओडिशात ‘तिळपीण पेण’ हा पदार्थ गुळापासून करतात, तर आसामी लोक खारट चव असलेला गुळाचा चहा पितात. या चहाला ‘छिलेकच्छा’असे म्हणतात.

गुळाचा वापर
करणारे मोठे राज्य महाराष्ट्र
एकूण उत्पादनाच्या ४५ टक्के गुळाचे उत्पादन महाराष्ट्रातून केले जाते. तसेच महाराष्ट्रात गुळाची मागणीही मोठी आहे. मराठी व गुजराती सण-समारंभात जसे गणेशोत्सव, दिवाळी, पाडवा, यासारख्या सणांत प्रामुख्याने गुळाचा वापर केला जातो. तिळगुळाचे लाडू, गणेशोत्सवात गव्हाची खीर, मोदक, पुरणपोळीतही गुळाचा वापर केला जातो.

कोल्हापूरच्या गुळाला गुजरातमध्ये मोठी मागणी आहे, तर उत्पादित मालाच्या पाच टक्के गूळ परदेशात पाठविला जातो. मागणीनुसार एक किलो, अर्धा किलो, पाव किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलो आणि तीस किलो या प्रमाणात रवे तयार केले जातात. जिल्ह्यात ६५ दलालांमार्फत त्याचा दर व लिलाव केला जातो, तर हा गूळ खरेदीदारांची संख्या १०० ते १२५ इतकी आहे. चार महिन्यांच्या हंगामात कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी असते. आॅक्टोबर ते फेबु्रवारी हा गूळ उत्पादनाचा व विक्रीचा हंगाम असतो. या हंगामाव्यतिरिक्त आॅफ सिझनचा गूळ म्हणून कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांमधून कर्नाटकी गूळ विक्रीसाठी बाजारात येतो.
- विजय नायकल
उपसचिव (कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर)

Web Title: Kolhapur big market: Every year 30 lakh 3 lakh sights lie in the district; More than 800 gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.