कोल्हापूर : राज्य शासनाने सूचना दिल्यानंतर केवळ पाच महिन्यांत जिल्ह्यातील सर्व १९५८ प्राथमिक शाळांमध्येसीसीटीव्ही बसवण्याची कामगिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करून दाखवली आहे. त्यामुळे कोल्हापूर हा ‘विद्या सुरक्षित जिल्हा’ म्हणून राज्यात पहिला आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.कार्तिकेयन म्हणाले, बदलापूर घटनेच्या आधी जिल्ह्यातील फक्त ५२ शाळांमध्येसीसीटीव्ही बसवण्यात आले होते. परंतु, शासनाच्या आदेशानंतर ३० ऑगस्टपासून ‘मिशन शाळा कवच’ही मोहीम आम्ही युद्धपातळीवर हाती घेतली. आता सर्व शाळांमध्ये ७ हजार ८३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, यासाठी ग्रामपंचायत, लोकसहभाग यातून साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तातडीने हे कॅमेरे बसवताना यंत्रणेचे स्पेसिफिकेशन आणि दर ठरवून बाराही तालुक्यांत स्वतंत्रपणे खरेदी प्रक्रिया राबवून अल्पावधीत हे काम करण्यात आले आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रेरणेने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकेयन आणि शेंडकर यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी यांनाही प्रशिक्षण देण्यात आले. उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, सहा. कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
- जिल्हा परिषदेच्या शाळा १९५८
- शिक्षण घेत असलेले विद्यार्थी १ लाख ४४ हजार ३२४
- एकूण बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ७,८३२
प्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये चित्ररथप्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये या विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला होता. चित्ररथ निर्मितीमध्ये सचिन कुंभार, किरण पाडळकर, राजू कोरे, प्रभाकर लोखंडे, तुषार पाटील, संयोगिता महाजन, अरुण सुनगार, अतुल सुतार, पल्लवी सारंग या शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आहे.