Kolhapur Politics: जागांचा तिढा; इच्छुकांची घालमेल अन् मतदार संभ्रमात; शेट्टी आघाडीत नाही आले तर..

By राजाराम लोंढे | Published: March 11, 2024 02:10 PM2024-03-11T14:10:16+5:302024-03-11T14:10:54+5:30

एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत रणनिती

Kolhapur and Hatkanangle Lok Sabha There is still no clarity about seat allocation | Kolhapur Politics: जागांचा तिढा; इच्छुकांची घालमेल अन् मतदार संभ्रमात; शेट्टी आघाडीत नाही आले तर..

Kolhapur Politics: जागांचा तिढा; इच्छुकांची घालमेल अन् मतदार संभ्रमात; शेट्टी आघाडीत नाही आले तर..

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : ‘कोल्हापूर‘ व ‘हातकणंगले’ लोकसभा जागांचा पेच अद्याप न सुटल्याने तर्कवितर्कांचे धुमारे दोन्ही मतदारसंघात फुटू लागले आहेत. यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू असली, तरी मतदारही काहीसा संभ्रमात दिसत आहे. हे जरी खरे असले तरी समोर ताकदवान मल्ल कसा आहे, त्याचा अंदाज घेऊनच महाविकास आघाडी व महायुतीकडून राजकीय पटावर प्यादी पुढे सरकवले जाणार आहेत.

वास्तविक महायुतीकडे विद्यमान खासदार असल्याने त्यांची नावे पहिल्या यादीतच जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने उमेदवारीबाबत संभ्रमावस्था आहे. ‘कोल्हापूर’च्या दोन्ही जागा शिवसेनेला जाणार असा त्यांचा दावा आहे, पण एकूण त्यांच्या हालचाली पाहता दोन पैकी एक जागा भाजपला हवी आहे. त्यातूनच वेगवेगळी नावे पुढे येऊ लागली आहेत. त्यात महाविकास’कडून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांना खासदार मंडलिक टक्कर देऊ शकतील का? त्यातूनच तर्कवितर्काचे धुमारे फुटू लागल्याने मंडलिक समर्थकांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे गेले आठ दिवस मंडलिक ॲक्शन मोडवर आले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातानाच त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. त्याची आठवण करून दिली जात आहे. मतदारसंघात खासदार मंडलीक यांची दोन-अडीच लाख मते आहेत, त्यांना डावलून ऐन वेळी दुसरे नाव पुढे केले तर मंडलीकांची बंडखोरी अडचणीची ठरू शकते. हे गणितही भाजप नेत्यांना माहिती असल्याने मंडलीक हेच उमेदवार म्हणून कायम राहतील, असे सध्याची तरी स्थिती आहे.

‘हातकणंगले’तून आघाडीची राजू शेट्टी यांच्यावर भिस्त आहे. ते आघाडीत येण्यास फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांना उघडपणे यायचे नाही. शेट्टी विरुद्ध खासदार धैर्यशील माने अशी लढत झाली तर माने यांच्या समोरील अडचणी वाढू शकतात. त्यात महायुतीतील नेते माने यांना उघड विरोध करू लागल्याने येथे काय होणार आहे ? याचा अंदाज भाजपला आला आहे. त्यातूनच पर्यायांची चाचपणी सुरु झाली आहे. यातूनच आमदार विनय काेरे, शौमिका महाडीक, राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली, तरी खासदार माने सहजासहजी ही जागा हातून सोडणार नाहीत.

सर्व्हेचा कल आणि भाजपची रणनीती

भाजप कोणत्याही निवडणुकीची तयारी फार अगोदरपासून करतो. या उलट निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, तरी उमेदवारावरून विरोधी पक्षात गोंधळाची स्थिती पाहावयास मिळते. भाजपने एक वर्षापासून टप्प्याटप्प्याने सर्व्हे केले आहेत. यामध्ये ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघात अपेक्षित यश दिसत नसल्याने त्यांनी चाचपणी सुरू केली आहे, ही वस्तूस्थिती आहे.

शेट्टी आघाडीत नाही आले तर अनपेक्षित नाव

राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले नाहीतर शिवसेनेकडून अनपेक्षितपणे नाव पुढे आणले जाणार आहे. रविवारी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली असून यातून मतदारसंघाच्या पश्चिमेकडील तालुक्यातील युवा नेत्याचे नाव ‘मातोश्री’वरून पुढे आले आहे.

Web Title: Kolhapur and Hatkanangle Lok Sabha There is still no clarity about seat allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.