कोगनोळी : येथील नवीन ग्रामपंचायत सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठीचे आरक्षण आज जाहीर झाले. अध्यक्षपदासाठी सामान्य महिला तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये सामान्य महिला या प्रवर्गामधून सहा महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे कोगनोळी ग्रामपंचायतीचे अध्यक्षपद हे पूर्ण कार्यकालापर्यंत महिलेच्याच हाती राहणार हे निश्चित आहे. उपाध्यक्षपदासाठी आरक्षित झालेल्या ओबीसी ब या प्रवर्गातून एकच उमेदवार निवडून आल्याने पाच वर्षांपर्यंत उपाध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे राहणार आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस प्रणीत ग्राम विकास आघाडी व भाजपप्रणीत परिवर्तन आघाडी अशीच प्रामुख्याने लढत झाली. यामध्ये ग्राम विकास आघाडीने ३२ जागांपैकी एका बिनविरोध जागेसह २५ जागा मिळवल्या तर परिवर्तन आघाडीने सात जागांवर विजय संपादित केला.
कोगनोळी ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST