'KMT' hits 5 lakhs, great floods: Only 2 buses run in a week | ‘केएमटी’स ७० लाखांचा फटका, महापुराचा झटका : आठवड्यात फक्त २५ बसेस धावल्या
‘केएमटी’स ७० लाखांचा फटका, महापुराचा झटका : आठवड्यात फक्त २५ बसेस धावल्या

ठळक मुद्दे‘केएमटी’स ७० लाखांचा फटका, महापुराचा झटका : आठवड्यात फक्त २५ बसेस धावल्या

कोल्हापूर : कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला असून त्याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागालाही (केएमटी) मोठ्या प्रमाणात बसला आहे. महापुराने थैमान घातले असताना शहराबाहेर जाणारे सर्वच रस्ते बंद राहिल्याने केएमटीच्या अवघ्या २५ बसेस शहरांतर्गत फिरत होत्या. त्यामुळे आठवड्यात सुमारे ७० लाख रुपयांचा फटका केएमटीला सोसावा लागला आहे.

गेल्या आठवडाभरात शहरात महापुराने थैमान घातल्याने अनेकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातून शहराकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर पुराचे पाणी आल्याने सर्वच रस्ते बंद राहिले. केएमटीकडे सध्या १२९ बसेस आहेत. त्यातील सुमारे १२० बसेस नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असतात. पण महापुरामुळे शहराभोवतीचे सर्वच रस्ते बंद राहिले.

परिणामी, केएमटीच्या अवघ्या २५ बसेस आठवडाभर प्रवाशांना सेवा देण्यासाठी शहरांतर्गत धावत होत्या; तर १० बसेस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे दिल्या होत्या. कमी बसेस धावल्याने आठवडाभरात सुमारे ७० लाख रुपयांचा फटका केएमटी प्रशासनास बसला आहे.

सध्या महापूर ओसरू लाागला आहे, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीस खुले झाले आहेत. पण तरीही चालकांअभावी बुधवारी फक्त ४० बसेस मार्गावर धावत होत्या. केएमटीचे अनेक वाहक व चालक ग्रामीण भागात राहत आहेत. सध्या महापुराचे पाणी ओसरू लागले असले घरामध्ये शिरलेले पाणी काढण्यात, घराची स्वच्छता करण्यात केएमटीचे चालक व्यस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील केएमटीचे चालक अद्याप नोकरीवर हजर झालेले नाहीत.

सणादिवशी ८० बसेस धावल्या

 गुरुवारी १५ आॅगस्ट स्वातंत्रदिन आणि रक्षाबंधनाचा सण असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील चालकांना नोकरीवर हजर होण्याच्या सूचना केएमटी प्रशासनाने दिल्या. त्यामुळे  गुुरुवारी सुमारे ८० बसेस मार्गावर धावल्या.


संपूर्ण शहराला महापुराचा विळखा असल्याने केएमटीच्या बसेस आठवडाभर शहराबाहेर धावू शकल्या नाहीत; त्यामुळे आठवड्यात केएमटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता रस्ते सुरू झाल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत केएमटीच्या फेऱ्या वाढविणार आहे.
- संजय भोसले,
अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक.
 

 

Web Title: 'KMT' hits 5 lakhs, great floods: Only 2 buses run in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.