के.एम.टी. बसवर ‘जीपीएस’ची नजर

By Admin | Updated: November 13, 2014 23:58 IST2014-11-13T23:55:43+5:302014-11-13T23:58:15+5:30

हायटेक महानगरपालिका : नियोजनातील अनागोंदीला चाप लावण्याचा प्रयत्न

K.M.T. 'GPS' on the bus | के.एम.टी. बसवर ‘जीपीएस’ची नजर

के.एम.टी. बसवर ‘जीपीएस’ची नजर

संतोष पाटील / कोल्हापूर
कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (के.एम.टी.)च्या नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सर्व १०४ बसेसवर जी.पी.एस. (ग्लोबल पोझिसिंंग सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व बसेस नेमक्या व प्रवाशांची गर्दी असणाऱ्या मार्गावरच फिरताना दिसतील. या प्रणालीचा फायदा प्रवाशांना नेमकी व जलद सेवा देण्याबरोबरच नियोजनातील अनागोंदीला चाप लावून उत्पन्नवाढीसाठीही केला जाणार आहे. बिंदू चौकातील जीपीएस केंद्रातून शहरातील सर्व बसेसवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याने बसमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास प्रवाशांना थेट केंद्राशी संपर्क साधता येईल.
के.एम.टी.च्या अनेक बसेस एकाच मार्गावरून प्रवाशांशिवाय धावत असल्याचे नेहमीचेच चित्र आहे. बस नेमकी कधी येणार याची खात्री नसल्याने प्रवासी खासगी तसेच अवैध वाहतुकीचा आधार घेतात. डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा डेपोत आल्यानंतरच एकूण दिवसभरात बसने किती गल्ला कमविला याचा आकडा कळतो. दिवसभरात मोठे नुकसान सोसूनही निव्वळ वेळापत्रक ठरले आहे म्हणून बसेस धावत असतात. गर्दीच्या ठिकाणी व झालेला वेळ भरून काढण्यासाठी इतर मार्गांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या बसेसचीही संख्या मोठी आहे.
अनेकवेळा बसथांब्यावर प्रवासी असूनही घेतले जात नाहीत. या सर्व अनागोंदी कारभारास आता जीपीएस प्रणालीमुळे पूर्णविराम मिळणार आहे.
४० बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे
केंद्र सरकारकडून प्राप्त ४४ कोटींच्या निधीतून बसेस खरेदीसाठी करासह ३० ते ३२ कोटींचा खर्च येईल. उर्वरित पैशांत एक डेपो, सर्व बसेसमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यासाठी निविदा मागविली आहे. ई-तिकिटिंग सेवा तसेच ४० बसथांब्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बस येण्यापूर्वी बसथांब्यावरील प्रवाशांना पूर्वसूचना मिळेल.
जीपीएसचे फायदे
वाहनाच्या नेमक्या ठिकाणाचा तत्काळ शोध
इंधन खर्च निम्म्यावर
तत्काळ सेवा
प्रवाशांच्या सुरक्षितेत वाढ
वाहनास तत्काळ सूचना देणे शक्य

Web Title: K.M.T. 'GPS' on the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.