हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी विचारवंतांच्या हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 23:42 IST2015-10-18T22:41:12+5:302015-10-18T23:42:19+5:30

प्रकाश आंबेडकर : बहुसंख्यांचे अधिकार हिसकावण्यास मोदी सरकारने प्रारंभ केल्याचा आरोप

The killing of the ideologues for the creation of Hindu Rashtra | हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी विचारवंतांच्या हत्या

हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी विचारवंतांच्या हत्या

सातारा : ‘धर्मांध शक्तींना २०२३ पर्यंत हिंदूराष्ट्र घोषित करण्याचे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी हे आपल्या परीने विचार मांडत होते. हे विचार हा हिंदुराष्ट्रनिर्मितीमधील अडथळा वाटल्यानेच त्यांच्या हत्या करण्यात आल्या, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातिमुक्ती आंदोलनाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन व मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. भारत पाटणकर, भीमराव बनसोड, उदय भट, किशोर ठोंबरे, पार्थ पोळके, किशोर ढमाले आदी उपस्थित होते.
डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘बहुजनांना आजही समाजात योग्य स्थान नाही. मुलांच्या शाळा कोसो दूर बांधल्या जातात. परिणामी मुले शाळेत जात नाहीत. शाळेत न गेल्यामुळे पदवी मिळत नाही. मुले अज्ञानी राहातात. हेच शासनाला हवं असतं.
काँग्रेसने भ्रष्टाचार केल्यामुळेच विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. त्यामुळेच भाजपची सत्ता आली. केवळ पर्याय म्हणून मोदींना लोकांनी स्वीकारले आहे. मात्र, मोदी सरकारने बहुसंख्यांचे अधिकार हिसकावून घेण्यास सुरूवात केली आहे.’
कामगारांचे अधिकार बळकावण्यास प्रारंभ झाल्याने आगामी काळात कामगारांचे राज्य आणल्याशिवाय गत्यंतर नाही, असे स्पष्ट करून डॉ. प्रकाश आंबेकडर पुढे म्हणाले, ‘उपोषण, मोर्चे, ठिय्या आंदोलने करून उपयोग नाही तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपल्याला राजकीय ताकद उभी करावी लागेल. मानवतावादी आणि आंबेडकरवादी सत्ता आली पाहिजे. तरच बहुजणांचा टिकाव लागेल. कामगारांना स्वत:चे वस्त्रहरण होऊ द्यायचे नसेल तर त्यांनी स्वत:च्या अधिकारासाठी येत्या २४ नोव्हेंबरला कोल्हापूरला होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.’ (प्रतिनिधी)


तिसरी हत्या होता कामा नये...
धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘संषर्घ यात्रेच्या माध्यमातून सनातवाल्यांना अहिंसेने उत्तर दिले पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात आता तिसरी हत्या होता कामा नये. कर्नाटकातही दुसरी हत्या होता कामा नये, यासाठी लोकांनी जागृत व्हायला पाहिजे.’

संघर्ष यात्रेची सांगता कोल्हापुरात
दि. २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातून संषर्घ यात्रा निघणार असून, या यात्रेचा समारोप २४ ला कोल्हापूर येथे होणार आहे. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सभा होणार आहे, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.

Web Title: The killing of the ideologues for the creation of Hindu Rashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.