Kolhapur: ‘ॲन्टी करप्शन’चे अधिकारी भासवत १० लाखांसाठी डॉक्टरचे अपहरण, तिघांना अटक; 'असे' फुटले बिंग 

By उद्धव गोडसे | Published: September 4, 2023 05:02 PM2023-09-04T17:02:50+5:302023-09-04T17:03:51+5:30

गर्भलिंग निदान होत असल्याची घातली भीती

Kidnapping of a doctor for 10 lakhs by pretending to be an anti-corruption officer, Three arrested in Kolhapur | Kolhapur: ‘ॲन्टी करप्शन’चे अधिकारी भासवत १० लाखांसाठी डॉक्टरचे अपहरण, तिघांना अटक; 'असे' फुटले बिंग 

Kolhapur: ‘ॲन्टी करप्शन’चे अधिकारी भासवत १० लाखांसाठी डॉक्टरचे अपहरण, तिघांना अटक; 'असे' फुटले बिंग 

googlenewsNext

कोल्हापूर : दवाखान्यात गर्भलिंग निदान होत असल्याचे सांगत कणेरी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे डॉ. सुभाष आण्णाप्पा डाक (वय ५५) यांच्या दवाखान्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बनावट अधिका-यांनी रविवारी (दि. ३) सकाळी छापा टाकला. गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाखांची मागणी करून त्यांनी डॉक्टरांचे अपहरण केले. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्यांचे बिंग फुटले.

सुयोग सुरेश कार्वेकर (वय ३८, रा. इंद्रायनी नगर, मोरेवाडी, ता. करवीर), रवींद्र आबासो पाटील (वय ४२, रा. वाशी, ता. कवीर) आणि सुमित विष्णू घोडके (वय ३३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. डाक हे गेल्या २६ वर्षांपासून राजापूर तालुक्यातील कणेरी येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या दवाखान्यासमोर एक कार येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या तिघांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यातील दोघे कोल्हापूरचे, तर एक अधिकारी दिल्लीहून आल्याची बतावणी केली. दवाखान्यात गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रार आल्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल, असे सांगत त्यांनी जबरदस्तीने डॉक्टरांना कारमध्ये बसवले. 

गगनबावडा येथे जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. डॉ. डाक यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने अपहरणकर्ते त्यांना कोल्हापुरात घेऊन आले. दरम्यान, डॉ. डाक यांनी पत्नी आणि मामेभाऊ डॉ. सुधीर कांबळे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. सायंकाळी सातच्या सुमारास अपहरणकर्ते डॉ. डाक यांना घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारी असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले.

असा झाला उलगडा

अपहरणकर्त्यांच्या पाठोपाठ डॉ. डाक यांचे मामेभाऊ कांबळे, मेहुणे सुरेश कदम हेदेखील प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत ॲड. मीना पाटोळे आणि ॲड. श्रद्धा कुलकर्णी होत्या. त्यांनी अपहरणकर्त्यांची ओळखपत्रे तपासताच तिन्ही संशयित ॲन्टी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया या खासगी संस्थेचे बनावट अधिकारी असल्याचे लक्षात आले. दरम्यान, डॉ. डाक यांनी ११२ नंबरवर फोन करून पोलिसांची मदत मागितली होती. काही वेळातच पोहोचलेल्या शाहूपुरी पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी डॉक्टरचे अपहरण करून खंडणी मागितल्याची कबुली दिली.

Web Title: Kidnapping of a doctor for 10 lakhs by pretending to be an anti-corruption officer, Three arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.