निप्पाणी दाजीपूर रस्त्याच्या कामाचा ठेकेदाराकडून खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:09+5:302021-06-16T04:34:09+5:30

राधानगरी : निप्पाणी-राधानगरी-दाजीपूर या आंतरराज्य मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामाचा ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे खेळखंडोबा झाला आहे. 70 किलोमीटर अंतरातील हे काम ...

Khelkhandoba from Nippani Dajipur road work contractor | निप्पाणी दाजीपूर रस्त्याच्या कामाचा ठेकेदाराकडून खेळखंडोबा

निप्पाणी दाजीपूर रस्त्याच्या कामाचा ठेकेदाराकडून खेळखंडोबा

राधानगरी : निप्पाणी-राधानगरी-दाजीपूर या आंतरराज्य मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामाचा ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे खेळखंडोबा झाला आहे. 70 किलोमीटर अंतरातील हे काम अडीच वर्षांतही पूर्ण होऊ शकले नाही. यातील जेमतेम पस्तीस टक्के काम झाले आहे. मात्र, त्याचाही दर्जा समाधानकारक नाही. शासनाने नव्याने सुरू केलेल्या हायब्रिड अ‍ॅन्युटी योजनेतील हा पहिलाच प्रयोग अयशस्वी ठरला आहे.

ठेकेदार कंपनीच्या कामाच्या पद्धतीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेका बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

देवगड-निप्पाणी हा संपूर्ण आंतरराज्य मार्ग यात समाविष्ट होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने सिंधुदुर्ग हद्दीतील काम नंतर वगळण्यात आले. पुण्यातील जितेंद्रसिह कंपनीने हा ठेका घेतला आहे. 2018 पासून काम सुरू आहे. मात्र, सुरुवातीपासूनच काम धीम्या गतीने सुरू आहे. निप्पाणी ते सुरुपली, सोळांकूर ते राधानगरी हद्द व फेजिवडे ते दाजीपूर या भागात काही प्रमाणात काम झाले आहे. मात्र, यातील मोठे पूल, मोऱ्या, पक्की गटारे, अंतिम डांबरीकरण, बाजूपट्ट्या व अन्य आनुषंगिक कामे अपुरी आहेत. झालेले कामही निकृष्ट असून आवश्यक दर्जानुसार नाही. त्यामुळे सर्वच थरातून याबाबत तक्रारी आहेत.

सुरुपली ते मुदाळ तिट्टा, नरतवडे ते सोळांकूर व राधानगरी ते फेजिवडे या भागात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वाहतूक करणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे जनतेमधून मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.

लोकांमधून होणाऱ्या तक्रारीमुळे सहा महिन्यांपूर्वी आ. प्रकाश आबिटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यासह संपूर्ण कामाची पाहणी केली होती. नंतर बांधकाम विभागाच्या पथकानेही झालेल्या कामाची तपासणी केली. यातून निघालेल्या निष्कर्षानुसार ठेकेदार बदलण्याचा पर्याय पुढे आला.

ठेका बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, यामध्ये अनेक अडचणी आहेत. 2018 च्या दराने काम मंजूर झाले आहे. ठेका बदलायचे झाल्यास झालेल्या कामाचे मूल्यांकन करून नवीन आराखडा व अंदाजपत्रक करावे लागेल यात सध्याच्या दराने रक्कम वाढणार आहे. त्यासाठी पुन्हा मंजुऱ्यांचे सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया वेळखाऊ ठरणार आहे.

225 कोटींच्या कामात 60 टक्क्यांनुसार शासन हिश्श्याचे 135 कोटी होतात. त्यातील 65 कोटी रुपये ठेकेदाराला अदा झालेले आहेत. त्याने गुंतवायची 40 टक्के रक्कम उभी करण्यास न आल्याने कामावर पुरेशी यंत्रणा निर्माण करता आली नाही. परिणामी, काम रेंगाळत गेल्याचे स्पष्ट होत आहे.

फोटो ओळ - निप्पाणी-दाजीपूर रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे.

राधानगरी ते फेजिवडेदरम्यान असे मोठे खड्डे पडले आहेत.

Web Title: Khelkhandoba from Nippani Dajipur road work contractor