छंदातून जपला ‘पोस्टकार्ड’चा ठेवा
By Admin | Updated: December 16, 2014 00:17 IST2014-12-15T20:56:34+5:302014-12-16T00:17:29+5:30
कागलच्या शामराव पाटील यांचा उपक्रम : हस्तकौशल्याद्वारे पाठविली अडीच हजार पत्रे

छंदातून जपला ‘पोस्टकार्ड’चा ठेवा
जहॉँगीर शेख - कागल -इंटरनेटच्या युगात संवादाची साधने बदलली आहेत. संवादाची पारंपरिक साधने बाजूला फेकली गेली आहेत. त्यापैकीच संदेशाचे देवाण-घेवाण करणारे एक साधन म्हणजे पोस्टकार्ड. ‘पोस्टकार्ड’चा वापर आता दुर्मीळ होत चालला आहे; पण कागलच्या सुभाष चौकातील ज्येष्ठ नागरिक शामराव भागोजी पाटील यांनी पोस्टकार्डचा हा ठेवा जिवापाड जपला आहे. त्यांनी सुमारे अडीच हजार हस्तलिखित पोस्टकार्डे पाठविली आहेत.
पाटील यांच्या संबंधित कोणतीही घटना घडू दे, ते त्याची दखल घेत संबंधिताशी पोस्टकार्डाच्या माध्यमातून संवाद साधतात. पोस्टकार्ड आपल्या हस्तलेखणाने सजवून-रंगवून आतापर्यंत सुमारे अडीच हजार पोस्टकार्डे पाठविल्याची नोंदही त्यांनी ठेवली आहे.
शामराव पाटील वीज महामंडळात नोकरीस होते. २००४ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला विविध क्षेत्रांत गुंतवून घेतले. त्यांच्या पिढीत संवादाचे महत्त्वाचे साधन असणारे पोस्टकार्ड आता अडगळीत पडत आहे. हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मग रोज एक पोस्टकार्ड लिहिण्याचा छंद सुरू केला. वाढदिवस, शुभेच्छा, यश, निवड, लग्न सोहळा, वास्तुशांती अशा कोणत्याही कौतुकाची बातमी समजली की, शामराव पाटील शुभेच्छा देण्यासाठी रंगीबिरंगी पोस्टकार्ड घेऊन संबंधितांच्या घरी पोहोचतात. इतकेच नाही, तर आजारपण, दु:खद प्रसंग याबद्दलही धीर देणारे चार शब्दही ते याच पोस्टकार्डच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवितात. कागल परिसरातील लोकांनाही आता पाटील यांच्या पोस्टकार्डच्या आगमनाची प्रतीक्षा लागलेली असते.
पोस्टकार्डाशी मैत्री
शामराव पाटील महिन्याला सरासरी २० ते २५ पत्रे लहितात. अनेकांनी त्यांची ही पत्रे लॅमिनेशन करून घरामध्ये दर्शनी भागात लावली आहेत. या छंदाबरोबरच पाटील हे येथील मॉर्निंग ग्रुप, ज्येष्ठ नागरिकांच्या गोलमेज परिषदेत सहभागी आहेत. पोस्टकार्डाचा हा छंद म्हणजे, खरे तर यानिमित्ताने पाटील यांनी पोस्टकार्डांशी बालपणापासूनची असणारी मैत्रीच जपली आहे.
छंद नसणारा माणूस आयुष्यभर एकाकीपणाची शिक्षा भोगत असतो. त्यामुळे उतारवयातील जीवन आनंदमय करण्यासाठी प्रत्येकाला अंत:करणातून एखादा छंद जोपासणे गरजेचे आहे. पोस्टकार्डाद्वारे लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे स्वत:ही आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद आणि मोठा आधार वाटतो. त्यामुळे मी दिवसातील काही तास खर्च करून पोस्टकार्ड लिहून ती पाठविण्याचा छंद जोपासला आहे.
- शामराव भागोजी पाटील, कागल
या पोस्टकार्डवर सुंदर, सुवाच्च, मोत्यासारखे हस्ताक्षर आणि आशयपूर्ण शब्दशृंखला तर असतेच; पण एखादी समर्पक कविता, श्लोक, शब्दरचनाही त्यामध्ये दिलेली असते. जेथे पत्ता लिहिण्यासाठी जागा असते, त्याला लागून जो मोकळा भाग असतो, त्या जागेवर त्यांनी प्रसंगानुरूप सुंदर असे चित्रही काढलेले असते. हे चित्र तर चित्रकारांची कसब दाखविणारे असते. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, एखादे प्रतीक, स्थळ तसेच व्यंगचित्र यामध्ये यांचा मुक्तसंचार यानिमित्ताने पाहायला मिळतो.