सोन्यासारख्या ‘झेंडू’ला कवडीमोल दर
By Admin | Updated: April 2, 2015 00:39 IST2015-04-01T23:50:16+5:302015-04-02T00:39:22+5:30
बाजारात दोन ते तीन रुपये किलो दर : व्यापाऱ्यांकडून एक रुपये किलोने झेंडू मागून चेष्टा; उत्पादनखर्चही न मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ

सोन्यासारख्या ‘झेंडू’ला कवडीमोल दर
प्रकाश पाटील - कोपार्डे -उसाला पर्याय शोधत दररोज आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फूल शेतीचा पर्याय निवडला आहे. यात झेंडू फुलाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले असले, तरी आज झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून सर्वांत जास्त उसाला प्राधान्य दिले जाते. मात्र, ऊसपीक किमान १२ ते १६ महिने सांभाळावे लागते. त्याची तोड झाल्यानंतरही वेळेत पैसे न मिळण्याबरोबर उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नसल्याने काही प्रयोगशील शेतकरी वेगळा पर्याय शोधून आपले शेतीतून अर्थकारण सांभाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यातही व्यापाऱ्यांची साखळी व बाजारपेठेचे योग्य नियोजन न समजल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून झेंडू फूल शेतीला प्राधान्य दिले जात आहे. चार महिन्यांच्या पिकामधून चांगला आर्थिक फायदा मिळेल म्हणून अनेक शेतकरी या फूल शेतीकडे वळले आहेत. सध्या सर्वत्र लग्नसराई, तसेच धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमाचा हा कालावधी असताना व या फुलांना यावेळेला महत्त्व असतानाही झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर घसरला असल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. झेंडू हे नाशवंत असल्याने फुलाचा तोडा झाल्यानंतर आठ ते दहा तासांत त्याची विक्री झाली तरच फायद्याचे ठरते; अन्यथा तो कोमेजल्यास फेकून द्यावी लागतात. सध्या जिल्ह्यात कोठेही फुलांसाठी साठवणुकीला शीतकेंद्रे नाहीत आणि शेतकऱ्यांकडे तशी सोयही नाही.
याचा फायदा बाजारातील खरेदी-विक्रीचे ज्ञान अवगत असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून उठविला जात आहे. सध्या बाजारात झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर घसरला असतानाही शेतकऱ्यांच्या आगतिकतेचा फायदा उठवत एक रुपया किलो दराने झेंडू फुले मागितली जात आहेत.
या झेंडूच्या प्रतिरोपाची किंमत चार ते पाच रुपये असून, खते, पाणी, बुरशीनाशक, कीटकनाशक, फुले तोडणी मजुरी, वाहतूक याचा एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आहे. मात्र, सध्या बाजारातील झेंडूला मिळणाऱ्या दराने १५ ते २० हजार रुपये प्रति एकर तोटा होणार आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस व हवामानातील बदलाने रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फुलाच्या प्रतवारीवरसुद्धा परिणाम झाला आहे.