कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा

By Admin | Updated: May 27, 2015 00:56 IST2015-05-27T00:45:36+5:302015-05-27T00:56:06+5:30

बंधाऱ्याची उंची कमी : करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांना दळणवळणाचे साधन असलेल्या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष

Kasba Beed-mahe bandhara dead death trap | कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा

कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा

शिवराज लोंढे -सावरवाडी -बेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आणि करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांच्या दळणवळणाची सोय असलेला तसेच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झालेला कसबा बीड-महे दरम्यानचा भोगावती नदीपात्रातील बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. बंधाऱ्याची उंची कमी असल्याने, दुतर्फा बाजूकडील भराव खचला गेल्याने तो अपघात क्षेत्र
ठरत आहे. ग्रामीण भागात दळणवळणाचा वाढता गुंता आणि ग्रामीण वाहतुकीची अवस्था बिकट झाली आहे. करवीर पश्चिम भागातील सुमारे ४० गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २४ एप्रिल १९७३ ला कसबा बीड-महे दरम्यान भोगावती नदीपात्रात या बंधाऱ्याची उभारणी केली. मुळात या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पूर परिस्थितीत पंधरा दिवस पुराचे पाणी बंधाऱ्यावर येते. पूर काळात पश्चिम भागातील ग्रामीण दळणवळण बंद होते. परिणामी पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होते. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला भराव नसल्यामुळे बंधाऱ्याजवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे लहानमोठे अपघात होतात. कसबा बीड-महे दरम्यान या बंधाऱ्यावरून दररोज लहानमोठी हजारो वाहने ये-जा करतात. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूस चढ असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूकडील रस्ता खचला गेल्याने मोठी वाहने उलटतात. बंधाऱ्याचा पृष्ठभागही अत्यंत खराब झाला आहे. बंधाऱ्याच्या देखरेखीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
बंधाऱ्याचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्याचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपूर्वीपासून शासनदरबारी रेंगाळला आहे. आमदार, खासदार यांच्या दुर्लक्षामुळे कसबा बीड बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. तो आणखी कितीजणांचा बळी घेणार, हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे. पश्चिम भागातील अपघातस्थळ म्हणून कसबा बीड बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन कामास सुरुवात करणे आवश्यक आहे.


कसबा बीड-महे बंधाऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. हे ठिकाण अपघातस्थळ म्हणून परिचित आहे. या बंधाऱ्यामुळे ४० गावांचे जनजीवन ठप्प होते.
बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लोकांनी लढा पुकारून तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे.
- कॉ. नामदेवराव गावडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा


कसबा बीड हा बंधारा सध्या धोकादायक अपघात क्षेत्र बनला आहे. बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूला मोठा चढ आहे. दुतर्फा भराव टाकलेला नाही. नव्या पर्यायी उड्डाणपुलाची उभारणी करणे गरजेचे आहे.
- भगवान सूर्यवंंशी,
काँग्रेस (आय) पक्ष

Web Title: Kasba Beed-mahe bandhara dead death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.