करवीर ‘डीबींची’ चौकशी रखडली

By Admin | Updated: February 23, 2015 23:56 IST2015-02-23T23:43:30+5:302015-02-23T23:56:17+5:30

न्यायालयीन आदेशानंतरही चालढकल : पोलीस प्रशासनाच्या ‘कारभारावर’ संशय

Karveer 'DB's' inquiry stopped | करवीर ‘डीबींची’ चौकशी रखडली

करवीर ‘डीबींची’ चौकशी रखडली

एकनाथ पाटील - कोल्हापूर - करवीर पोलीस ठाण्यामधील सात पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा न करता मोबाईल शॉपीमधील साहित्य हस्तगत करून परत न देणे, ते परत देण्यासाठी हजारो रुपयांची लाच मागणे, अशा गंभीर आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनास दिले होते. या आदेशाची प्रत प्राप्त होऊनही अद्यापही चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
तौसिफ खलील शेख याने कॉम्प्युटर व मोबाईल शॉपीमधून पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची मागणी त्यांच्याकडे केली; परंतु हे साहित्य पोलिसांनी परत दिले नाही. त्यामुळे त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात पोलिसांच्या विरोधात रिट दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. डॉ. शर्मा यांनी आदेशाची प्रत मिळताच चौकशी केली जाईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. आता ही प्रत मिळूनही चौकशीचे आदेश न दिल्याने ‘पोलीस अधीक्षकांकडून या करवीरच्या पोलिसांना अभय दिले जातेय काय?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डीबी पथक) कार्यान्वित आहे. या पथकामध्ये वास्तविक प्रशिक्षण घेऊन अंगातील कौशल्य दाखवून नियुक्ती व्हावी, अशी नियमावली आहे; परंतु आजकाल कौशल्यापेक्षा ज्याचे राजकीय हितसंबंध चांगले त्याचीच वर्णी या जागी लागते. पदासाठी आवश्यक असणारे गुण, सांकेतिक भाषा, गुन्हे शोधून काढण्यासाठीची दूरदृष्टी, बोलण्यातील लकब, आरोपींच्या मनातील भाव जाणून त्याच्याकडून सत्य वदवून घेण्यासाठीची लागणारा ‘साम, दाम, दंड, भेद’ यापैकी एकही गुण आताच्या ‘डीबी’ पथकातील पोलिसांच्या अंगी नाही. वशिल्यांवर आलेले हे पोलीस गुन्हेगारीला प्रोत्साहन देत स्वत: आर्थिक बाजूने मोठे व्हायचा प्रयत्न करतात, अशा काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांमुळे सर्वच पोलिसांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही तसाच बनतो.

कारवाई संशयास्पद
करवीरच्या पोलिसांनी शेखच्या मोबाईल शॉपीची पाहणी केली. त्यावेळी हवालदार बबलू शिंदे याने मोबाईल शॉपीमध्ये येण्यापूर्वी शर्टच्या आतमध्ये चार-पाच मोबाईल लपविल्याचे दिसले. त्यानंतर तेच मोबाईल काढून दुकानात चोरीचे मोबाईल सापडल्याचे त्याने दाखविले. पोलिसांनी दुकानाची केलेली तपासणी व जप्त केलेल्या साहित्याचे संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे. हे चित्रीकरण पाहिले असता कारवाई संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसून येते. बंकट थोडगे मारहाण प्रकरणात याच पोलिसांचा समावेश होता. दोन महिन्यांपूर्वी एका म्हैस चोरी प्रकरणात याच पथकातील एकाने कारवाईची भीती दाखवून २५ हजार रुपये काढून घेतल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे.


न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली आहे. ती पाहून लवकरच चौकशी अधिकारी नियुक्त करून प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
- डॉ. मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक

Web Title: Karveer 'DB's' inquiry stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.