कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी
By Admin | Updated: June 29, 2014 01:10 IST2014-06-29T01:06:27+5:302014-06-29T01:10:16+5:30
नांदणीत तरुणास अटक; वृत्तवाहिनीला मुलाखत

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी
इचलकरंजी : कर्नाटकाचे गृहमंत्र्यांसह कुख्यात गुंडांना वृत्तवाहिन्याद्वारे मुलाखत देऊन ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास आज, शनिवार कोल्हापूर व कर्नाटक पोलीस पथकाने अटक केली. श्रीहंस बापूसो पाटील (वय ४५, रा. शाहूपुरी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. शिवाजी गावडे नावाचा वापर करून त्याने हा प्रकार घडवून आणला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील एका वृत्तवाहिनीवर शुक्रवारी शिवाजी गावडे नावाचा वापर करून एकाने खळबळजनक मुलाखत दिली. या मुलाखतीद्वारे त्याने कर्नाटकातील गृहमंत्र्यांसह कुख्यात गुंड रवी पुजारीसह आणखीन गुंडांना ठार मारणार असल्याची धमकी दिली होती. हा प्रकार पोलिसांनी रोखून दाखवावा, असे आव्हानही त्याने या मुलाखतीद्वारे दिले होते. या मुलाखतीनंतर कर्नाटकातील पोलीस दलात खळबळ माजली होती. गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकातील पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत होता.
मोबाईल लोकेशनवरून ही व्यक्ती कुरुंदवाड येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला होता. यावरून अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे मानसिंग खोचे व त्यांच्या संयुक्त पथकाद्वारे शोध घेण्यात येत होता. संबंधित गावडे याने कुरुंदवाड येथून पुन्हा नांदणी येथे पलायन केले. नांदणी स्टॅँड चौकात या पथकाने त्याला मोटारसायकलीवरून फिरत असताना पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी करताना संबंधित व्यक्ती ही कोल्हापुरातील श्रीहंस पाटील असल्याचे उघड झाले.
श्रीहंस याच्यावर कोल्हापुरात फसवणुकीसह आणखी काही गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो गुन्हेगारांशी संधान साधून होता. गुन्हेगारी क्षेत्रात नाव करण्यासाठीच त्याने शिवाजी गावडे हे नाव धारण करून खळबळजनक धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. असे असले तरी संबंधित श्रीहंस याने धमकी देण्यामागे नेमके हेच कारण आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.