करपलं रान देवा, जळलं शिवार...
By Admin | Updated: July 17, 2015 00:09 IST2015-07-17T00:09:07+5:302015-07-17T00:09:07+5:30
शेतकरी चिंताग्रस्त : पावसाच्या दडीने खरिपाची विस्कटली घडी; किडींचाही प्रादुर्भाव वाढला

करपलं रान देवा, जळलं शिवार...
कोल्हापूर : जिल्ह्यात तीन लाख ९३ हजार ८६९ पैकी तीन लाख ४८ हजार ३४४ हेक्टर क्षेत्रांवर खरीप हंगामासाठी विविध पिकांची पेरणी झाली आहे. एकूण ८८ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम संकटात आला आहे. पिकांची वाढ खुंटली असून, ते करपण्याच्या मार्गावर आहेत. सर्वच पिकांवर कमी, अधिक प्रमाणात हुमणी, पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढत आहे. तांबेरा आणि मावा किडीची लागण उसाला झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी दिवसभर शहर आणि जिल्ह्यात ऊन आणि तुरळक पावसाच्या सरी असे वातावरण राहिले. कोणत्याही क्षणी मोठ्या पावसाची संततधार सुरू होईल, अशी ढगांची गर्दी झाली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. यंदा उन्हाळ्यात वळवाने वारंवार हजेरी लावली. परिणामी जमिनीत खोलवर ओल निर्माण झाली. मॉन्सूननेही चांगली सलामी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात गतीने पेरणी केली. पहिल्याच आठवड्यात तब्बल पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. त्यानंतर पावसाची संततधार सुरू राहिल्याने पिकांची वाढ चांगली झाली. तथापि २६ जूनपासून संततधार पावसाला ब्रेक लागला. १ व २ जुलैला अल्प पाऊस झाला. पुन्हा पावसाचा खंड पडला. दुपारच्यावेळी कडाक्याचे ऊन पडत आहे. उष्णता प्रचंड वाढते आहे. दरम्यान, ९ ते १२ पर्यंत पश्चिमेकडील तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ‘सर्वाधिक पावसाचा तालुका’ म्हणून ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्यात दिवसातून एक-दोन पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. उर्वरित तालुक्यांत पावसाने दडी मारली आहे.
सर्वच पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. परिणामी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. खडकाळ जमिनीला भेगा पडल्या आहेत. पिके करपून जात आहेत. ढगाळ वातावरण राहूनही पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शक्य तेथे शेतकरी पाणी देत आहेत. आणखी चार दिवस पाऊस पडला नाही, तर खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात येईल.
महत्त्वाचे पीकनिहाय
पेरक्षेत्र हेक्टरमध्ये
भात :८५ हजार ४८४
ज्वारी : ३ हजार ९४१
नागली : १३ हजार ९६६
मका : १६८७
इतर तृणधान्य११८०
तूर :२१३५
मूग :११५८
उडिद : ११२२
इतर कडधान्ये : १३०२
भुईमूग : ४१ हजार ७१०
सूर्यफूल : १५
कारळा ३४५
सोयाबीन : ३८२८०
भाजीपाला : १३९४
ताग व अन्य ३२६८
इतर चारापीक
खडकाळ जमिनीतील पिके वाळत आहेत. ती कोमेजू नयेत म्हणून वारंवार मशागत करीत राहावे. चार दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास सर्वच पिके धोक्यात येण्याची भीती आहे.
- चंद्रकांत सूर्यवंशी,
कृषी विकास अधिकारी
पावसाने ओढ दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. खरीप हंगाम संकटात आला आहे. पिकांची वाढ थांबली आहे. उर्वरित क्षेत्रातील पेरणी व भातरोप लागण ठप्प झाली आहे.
- सुधीर कानडे, शेतकरी, दुंडगे (ता. गडहिंग्लज)
पावसाने दमदार सलामी दिल्याने झटपट पेरणी केली. सुुरुवातील घातही चांगली मिळाली. त्यामुळे मशागतीची कामेही पूर्ण केली; पण आता पाऊसच नसल्याने पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
- के.आर.पाटील, शेतकरी, बेलवळे बुद्रुक (ता. कागल)
चोवीस तासांतील पाऊस...
गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत आजरा तालुक्यात १.३, चंदगडमध्ये २.८, भुदरगडमध्ये २, गगनबावड्यात ३, शाहूवाडी, राधानगरीत अनुक्रमे दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यात पाऊस पडलेला नाही.
पाणीसाठा
एकूण क्षमतेपैकी धरणातील पाणीसाठा टक्केवारीत असा: राधानगरी - ४६, तुळशी - ५१, वारणा-७१, दूधगंगा-४४, कासारी-६४, कडवी-५९, कुंभी-५०, पाटगाव-५५, चिकोत्रा - ३१, चित्री - ४३, जंगमहट्टी-५७, घटप्रभा-१००, झांबरे-७५, कोदे-१००.
जूनमध्ये ३३७.७९
जुलैला ७५७.३९
आॅगस्टला ४७७.८८
सप्टेंबरमध्ये १९९.३१
आॅक्टोबरमध्ये १२६.६८