कोल्हापूर : ‘अटल महापणन’मध्ये अरुण काकडे राज्यात नंबर वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:16 IST2019-01-15T17:12:53+5:302019-01-15T17:16:19+5:30
राज्य सरकारने राबविलेल्या ‘अटल महापणन अभियान २०१६-१७’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात नंबर वनची कामगिरी केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

अटल महापणन अभियानात राज्यात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांचा सोलापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी गणेश शिंदे, योगेश मस्के, राजेंद्र भोसले, सुनील पवार, शैलेश कोतमिरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर : राज्य सरकारने राबविलेल्या ‘अटल महापणन अभियान २०१६-१७’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात नंबर वनची कामगिरी केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
राज्यातील विकास संस्था, खरेदी-विक्री संघांच्या बळकटीकरणासाठी ‘अटल महापणन अभियान’ राबविण्यात आले होते. प्रत्येक जिल्हा उपनिबंधकांवर याची जबाबदारी दिली होती. संस्थांनी पीक कर्ज वाटप, खत विक्रीसह इतर व्यवसाय सुरू करून स्वत:चे उत्पन्न वाढविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी यामध्ये झोकून देऊन काम करीत अनेक संस्थांना विविध उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित केले. शासकीय व बॅकिंग पातळीवर येणाऱ्या अडचणींमध्ये त्यांनी मदत केल्याने राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचे उत्कृष्ट काम झाले आहे. त्याची दखल राज्य सरकारने घेतली असून, सोमवारी सोलापुरात झालेल्या एका कार्यक्रमात अरुण काकडे यांना सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्याचबरोबर जिल्हास्तरीय पातळीवर शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनाही मंत्री देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर चंदगड व आजरा खरेदी-विक्री संघ, श्रीराम विकास (कसबा बावडा), कोथळी विकास (शिरोळ), शेडसाळ विकास (शिरोळ) या संस्थांचाही गौरव करण्यात आला. यावेळी अटल महापणनचे गणेश शिंदे, पणन मंडळाचे योगेश मस्के, अप्पर निबंधक सुनील पवार, शैलेश कोतमिरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त साबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.