(प्रभागाचा कानोसा) दाखल्यावर विरोधकांचे लक्ष, चाचपणीत सारेच झाले दक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:33+5:302021-01-08T05:15:33+5:30

विद्यमान नगरसेवक : इंदुमती माने आताचे आरक्षण : ओबीसी पुरुष तानाजी पोवार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्रत्येक महानगरपालिकेच्या ...

(Kanosa of the ward) | (प्रभागाचा कानोसा) दाखल्यावर विरोधकांचे लक्ष, चाचपणीत सारेच झाले दक्ष

(प्रभागाचा कानोसा) दाखल्यावर विरोधकांचे लक्ष, चाचपणीत सारेच झाले दक्ष

विद्यमान नगरसेवक : इंदुमती माने

आताचे आरक्षण : ओबीसी पुरुष

तानाजी पोवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत फुलेवाडी प्रभागातील गायरानमधील प्रॉपर्टी कार्ड हा विषय केंद्रस्थानी असतो. ४० वर्षे याच प्रश्नावर फुलेवाडी प्रभागाची निवडणूक रंगते; पण हा प्रश्न आजही ‘लाल फिती’त गुंतून आहे.

फुलेवाडी प्रभाग क्र. ७२ या मतदार संघात नेहमीच स्वबळावर निवडणूक होते. यंदा निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी पुरुष वर्गासाठी राखीव झाल्याने गेल्या २० वर्षांतील आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांनी ‘कुणबी’चा आधार घेत उमेदवारीचे पत्ते तयार ठेवले आहेत. तरीही प्रत्येक इच्छुकांची विरोधकाच्या हालचालीवर बारीक नजर आहे. अद्याप तरी इच्छुकांनी फक्त चाचपणीवरच भर दिला आहे. प्रभागावर नेहमी माने-पाटील यांच्यातच महापालिकेचे राजकारण फिरत आहे.

नगरसेविका इंदुमती माने यांचे चिरंजीव नगरसेवक राहुल माने यांनीही अद्याप उमेदवारी जाहीर केली नसली तरीही कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी त्यांचे असणारे निकटचे संबंध पाहता त्यांनाच कॉग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जाते. मातोश्रीच्या माध्यमातून या प्रभागात केलेल्या विकासकामांचा आरसाच त्यांनी मतदारांसमोर ठेवला आहे. यापूर्वी तीनवेळा प्रभागाचे नेतृत्व करणारे सर्जेराव पाटील-शालिनी पाटील या काका-काकीच्या राजकीय शिदोरीवर मानसिंग पाटील हेही आपली उमेदवारी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. गत निवडणुकीत दुसर्या क्रमांकाची मते घेणाऱ्या भाजपच्या रचना मोरे यांचे पती भाजपचे शहर उपाध्यक्ष राजू मोरे हेही रिंगणात उतरत आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या स्मिता दरवान यांचे पती माजी नगरसेवक किरण दरवान व माजी नगरसेविका रेखा पाटील यांचे पती राजेंद्र पाटील हेही सद्यातरी चाचपणी करत आहेत. त्यामुळे माने व मोरे वगळता इतर इच्छुकांपैकी राष्ट्रवादीचे घड्याळ कोणाच्या हाती तर शिवसेनेचा शिवधनुष्य कोण उचलते हाही उत्सुकतेचा विषय आहे.

प्रभागात झालेली कामे-

- महत्मा फुले विद्यालय व मैदानाचे आधुनिकीकरण

- छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित, गेमिंग झोन

- ड्रेनेज, पाईपलाईन, एलईडी लाईट, रस्ते पूर्ण

- फुलेवाडी १ ला स्टॉप ते जकात नाका पर्यत रस्त्याकडेला ऑक्सिजन पार्क

- बंद पडलेला माने सांस्कृतिक हॉल कार्यान्वीत

- श्री दत्त मंदीरसमोरील रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरण

- फुलेवाडी ६ वा स्टाॅप सुशोभिकरण, पाणी प्रश्न निकाली

- दुसरा व पाचवा स्टाॅप सुशोभिकरण सुरु

- कोंडाळेमुक्तीकडे वाटचाल. सद्या १७ पैकी फक्त ५ कोंडाळे कार्यान्वीत

- प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम

- कोवीड उपचार सेंटर

अपुरी कामे..

- गायरान प्रॉपर्टी कार्ड प्रश्न प्रलंबीत

- काही ठिकाणी कचरा कोंडाळे

- भुयारी गटर्सवर झाकण नाही

- ओपन स्पेस कॉंक्रिटीकरण नाही

म्हैशींच्या शेणाचा रोज उठाव

फुुलेवाडी प्रभागात बहुतांशी शेतकरी हे दुग्ध व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरातील म्हशी, गायींचे रस्त्याकडेला लागणारे शेणाचे ढिग गेल्या चार वर्षात बंद झाले. नगरसेविका इंदूमती माने यांनी फुलेवाडी प्रभागात रोज ट्रॅक्टर-ट्रॉली दारोदारी पाठवून शेणाची उचल करुन त्याचा योग्य मोबदला शेतकर्याना दिला. घरा-घरातून उठाव केलेल शेण शेतकर्याला खत स्वरुपात विक्री करण्याचा अनोखा उपक्रम राबवला. त्यामुळे प्रभागात भरपूर गायी, म्हशी असूनही रस्त्याकडेला कोठेही शेणाचे ढिग दिसले नाहीत, त्यामुळे कचराही कमी झाला.

- गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत जास्तीत जास्त विकास कामे पूूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मैदानाचे सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण हे महत्वाचे काम पूर्ण झाले आहे. हे मैदान सरावासाठी योग्य बनले तसेच विद्युत रोषणाईने झळकले आहे. २०१९-२० चे संपूर्ण बजेट हे महात्मा फुले विद्यालयाच्या विकासासाठी वर्ग केले आहे. - इंदुमती माने, माजी नगरसेविका.

गतनिडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :

- इंदुमती शिवाजी माने (कॉंग्रेस) : २३७७

- रचना राजू मोरे (भाजप) : १०८६

- माधुरी संदीप पाटील (राष्ट्रवादी) : ९४८

- स्मिता किरण दरवान (शिवसेना) : १९९

फोटो नं. ०५०१२०२१-कोल-फुलेवाडी (केएमसी)

ओळ : फुलेवाडीतील रस्त्याकडेच्या भूयारी मार्गावरील झाकणे उघडी राहील्याने धोकादायक स्थिती उद्‌भवली आहे.

Web Title: (Kanosa of the ward)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.