कागलकरांच्या डोळ्यांना जुबेदा-जरिनाची ‘नजर’
By Admin | Updated: October 16, 2015 22:37 IST2015-10-16T22:05:39+5:302015-10-16T22:37:26+5:30
कागलशी ऋणानुबंध : आठवडी बाजारात ४0 वर्षांपासून चष्मे-गॉगलची विक्री-दुरुस्ती

कागलकरांच्या डोळ्यांना जुबेदा-जरिनाची ‘नजर’
जहाँगीर शेख -कागल È-येथील आठवडी बाजार म्हणजे बहुमिश्र संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. या बाजाराचे आणि येथे येणारे छोटे-मोठे विक्रेते यांच्यातील ऋणानुबंध अर्धशतकाच्याही पुढे जाऊन पोहोचले आहेत. एक विशिष्ट जागा आणि हे विक्रेते असे समीकरणच झाले आहे. गडहिंग्लज येथे राहणाऱ्या आणि नेहमी हैदराबादी पेहराव्यात असणाऱ्या चष्मे-गॉगल दुरुस्ती-विक्री करणाऱ्या जुबेदा आणि जरिना इराणी या बहिणींचेही या कागलच्या आठवडी बाजाराशी गेली ४० वर्षे ऋणानुबंध तयार झाले आहेत.
शाहूनगर वाचनालयासमोरील गेटजवळ एका लाकडी खोक्यावर सुटकेस उघडी ठेवून थाटलेले चष्मे-गॉगल दुरुस्तीचे हे दुकान आणि त्यांच्या शेजारी हैदराबादी परिसरातील महिला परिधान करतात असे सलवार कमीज परिधान करून उभ्या असलेल्या जुबेदा आणि जरिना गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ हे चित्र कागल आणि परिसरातील लोक पाहत आलेले आहेत. जुबेदा सिकंदर इराणी आणि जरिना मेहबूब इराणी या सख्ख्या बहिणी आता साठीकडे पोहोचल्या आहेत. वयाच्या १६ व्या वर्षांपासून त्या दर सोमवारी कागलच्या बाजारासाठी येतात. त्यांचा वडिलोपार्जित चष्मे दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय आहे. पूर्वी वडील आणि पती हा व्यवसाय करीत. वडिलांनंतर थोरली बहीण जुबेदा कागलला येऊ लागली. त्यातच पतीच्या निधनानंतर बाळाला कडेवर घेऊन जरिनाही कागलला येऊ लागली. त्यांचा हा जीवन प्रवास आजही कागलकरांच्या ऋणानुबंधाने सुरू आहे.
आज शहरात सात ते आठ अद्ययावत चष्मा विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र, दहा ते पंधरा वर्षांपूर्वी एखाद दुसरे, तर वीस वर्षांपूर्वी चष्मा दुरुस्तीचे एकमेव दुकान म्हणजे या इराणी बहिणीच होत्या. १९७०च्या दशकातील गॉगलची फॅशन तसेच नंबरचे चष्मे वापरण्याचे वाढलेले प्रमाण असताना त्याकाळी त्या ‘नळकांडी’सारख्या मशीनचा वापर करून चष्म्याचा नंबर काढून देत होत्या. नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचा वापर बंद झाला. या बहिणींचे कागलच्या आठवडी बाजाराशी एक वेगळेच ऋणानुबंध तयार झाले आहेत.
ज्या काळात कागलमध्ये चष्माचे नंबर काढून देणारे, दुरुस्ती-विक्री करणारे दुकान नव्हते, तेव्हा या बहिणींनीच असंख्य लोकांना नेत्रसेवा दिली आहे. बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना कधीही फसवले नाही. प्रामाणिकपणे त्यांनी व्यवसाय जपला आहे. आता माझे वय ७० आहे. मी आठवीत असल्यापासून या दोघींना पाहतो आहे.
- एन. डी. जाधव
ज्येष्ठ नागरिक, कागल
दीडशे ते दोनशे वर्षांपूूर्वी इराणी कुटुंबाचा कोणीतरी भारतात येऊन हा चष्मे दुरुस्ती, विक्रीचा व्यवसाय करीत होता. मुस्लिम शिया पंथीय असणारे लोक पारसी भाषा बोलतात.
४आता त्यांची जवळपास ३५ कुटुंबे गडहिंग्लज येथे स्थायिक आहेत. या दोघी बहिणींनी या व्यवसायावर फार प्रगती केली नाही; पण कुटुंबांचा चरितार्थ चालविला. मुलांना मोठे केले. जुबेदा यांना तीन मुले, तर जरिना यांना दोन मुले आहेत.
कागलचा वाईट अनुभव आलाच नाही
मुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना जरिना इराणी म्हणाल्या की, ऐन तरुण वयात लहान बाळ कडेवर घेऊन मी येथे येत असे. मात्र, कधीही भीती वाटावी अथवा लाज वाटावी, अशी वागणूक आम्हाला मिळाली नाही. ग्राहक म्हणून पिढ्या बदलल्या; पण आम्हाला सन्मानाचीच वागणूक मिळाली आहे.