कागल : आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्ता जपण्यासाठी स्वतःच्या भावजय बिल्कीश अन्वर मुश्रीफ यांचा पराभव करीत माणिक माळी यांना नगराध्यक्षा म्हणून निवडून आणले. गेली दहा वर्षे रमेश माळी हेच नगरपालिकेतील मुश्रीफ गटाचे कारभारी होते. आता पुन्हा तिकीट मिळणार नाही म्हणून ते राजे गटात गेले आहेत. कागलची जनता हे सर्व जाणते म्हणून या पक्ष बदलाने त्यांच्या विषयी शहरात रोष पसरला आहे. हसन मुश्रीफांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असून ही गोष्ट मुश्रीफ गटाच्या विजयाची नांदी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे संचालक भैय्या माने यांनी केले.
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा माणिक रमेश माळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज मुश्रीफ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. प्रकाश गाडेकर म्हणाले समरजित घाटगे हुशार आहेत राजे गट सोडून संजयबाबा गटात, त्यांना सोडुन मुश्रीफ गट व दहा वर्षे सर्व सत्ता भोगुन परत राजे गटात आलेल्या माळींना ते योग्य जागीच ठेवतील.
अजित कांबळे म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीत आमदार मुश्रीफांनी डोळ्यांत अश्रू आणुन म्हटले होते की, माझी भावजय उमेदवार आहे. जर माणिक माळी यांना दगाफटका झाला तर माझ्या राजकीय कारकिर्दीस डाग लागेल. हे अश्रू रमेश माळी विसरलेत पण मतदार विसरलेले नाहीत. चंद्रकांत गवळी म्हणाले की, रमेश माळी यांनी कोठेही जावे. पण जाताना पहिल्या घरावर शितोंडे उडवू नयेत. नवल बोते, अशोक जकाते, सुनील माळी, विक्रम जाधव यांनीही भावना व्यक्त केल्या. नितीन दिंडे यांनी स्वागत व आभार मानले.
जनक घराण्याबद्दल बेगडी प्रेम
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज आमचे दैवत आहेत. विक्रमसिंह राजेंबद्दल आम्ही नेहमीच आदर ठेवला आहे. पण रमेश माळी यांनी राजेंना सोडून संजयबाबा गटात प्रवेश केला. शाहू साखर कारखान्याची निवडणूक लढवली. खालच्या पातळीवर येऊन टीका-टिप्पणी केली. आता त्यांनी जनक घराण्याबद्दलचा कळवळा आम्हाला शिकवू नये.